भारतीय कला, भारतीय धर्म व तत्त्वज्ञान यांच्याशी इतकी निगडित आहे की, ज्या ध्येयांनी भारतीय मनोवृत्तीवर सतत परिणाम केला आहे, त्या ध्येयांची माहिती असल्याशिवाय भारतीय कलेचेही अंतरंग समजणार नाही.  संगीताप्रमाणे कलेतही पाश्चिमात्य कल्पना व भारतीय कल्पना यांत फार मोठे अंतर आहे.  युरोपातील मध्ययुगीन शिल्पकार व कलाकार यांना भारतीय कला व शिल्प अर्वाचीन युरोपियनांना शक्य नाही इतके जवळचे वाटले असते. अर्वाचीन युरोपियन कलावंतांना पुष्कळशी स्फूर्ती युरोपातील नवयुगापासून आणि नंतरच्या काळातून मिळाली आहे, त्यामुळे त्यांना भारतीय कला समजणे कठीण.  परंतु मध्ययुगीन युरोपियन शिल्पकारांची व कलावंतांची स्फूर्ती धर्ममय होती.  म्हणून त्यांनाच भारतीय कलेचे अंतरंग कळणे शक्य आहे.  भारतीय कलेत धर्मप्रेरणा आहे.  काहीतरी संसारातील, पारलौकिक, पलीकडचे असे आहे.  युरोपातील नामांकित ख्रिस्त मंदिरे बांधणार्‍यांची दृष्टी अशीच होती.  ह्या दृष्टीने सौंदर्य हे नुसत्या रूपावर, आकारावर अवलंबून नाही, ते अंतरंगीच्या भावनेवर आहे, त्या सौंदर्याचा आविष्कार प्रत्यक्ष होताना त्याचे रूप, त्याचा पार्थिव अंशा सुंदर होत असला तरी मुळात हे सौंदर्य सत्त्वांशाचे आहे.  ग्रीक नुसत्या सौंदर्यासाठी म्हणून सौंदर्याचे उपासक होते; त्यांना सौंदर्यात केवळ आनंदच मिळे असे नाही तर सत्यही सापडे; प्राचीन भारतीयांनाही सौंदर्य प्रिय होते.  परंतु आपल्या कलाकृतीत काहीतरी अधिक खोल अर्थ आणण्याचा त्यांचा प्रयत्न चाले.  जे अंतिम सत्य त्यांच्या अंतश्चक्षूंस दिसे त्याचेही दर्शन त्या सौंदर्यात, त्या सुंदर कलाकृतींत व्हावे अशी त्यांना उत्कटता असे.  भारतीयांच्या परमोच्च आविष्काराच्या कलाकृती पाहून त्या निर्माण करणारांचे ध्येय काय होते, कल्पना काय होत्या ते समजत नाही तरी त्यांचे कौतुक वाटल्यावाचून राहात नाही.  परंतु ज्या कलाकृती तितक्या परमोच्च दर्जाच्या नाहीत, त्या पाहून जर कलावंतांच्या मनाशी आपण एकरूप होऊ शकलो नाही, त्यांच्या मनातील कल्पना, विचार कळले नाहीत, तर तितका रसास्वाद आपण घेऊ शकत नाही; त्या कलाकृतीतील सौंदर्य कळायला काहीतरी अडथळा होतो असे वाटते.  आपल्याला यातील काहीही कळत नाही असे मनात येऊन आपण अस्वस्थ होतो, चिडतो, आणि मग आपण शेरा मारतो की, या कलावंतांना कला काय ते कळत नव्हते.  कधी कधी आपणांस तिटकाराही येतो.  बघू नये असेही वाटते.

कलेविषयी मला फारसे कळत नाही, मग ती पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य असो.  अधिकारवाणीने त्यासंबंधी बोलायला माझी पात्रता नाही; परंतु एखादे चित्र, एखादी इमारत, एखादा शिल्पाचा नमुना पाहून मला आनंद होतो व माझे हृदय उचंबळून एक प्रकारची अननुभूत अशी भावना मी अनुभवतो.  कधी कधी नुसते जरा बरे वाटते; कधी मला काहीच न वाटता मी पुढे जातो, कधी मला पाहू नये असे वाटते, तिटकारा वाटतो.  माझ्यावर या ज्या प्रतिक्रिया होतात त्या का होतात ते मी नीट सांगू शकणार नाही, कलाकृतीतील गुणावगुणाविषयीही मी पांडित्यप्रचुर निवेदन करू शकणार नाही.  सीलोन-मधील अनुराधापूर येथील बुध्दांचा पुतळा पाहून माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता आणि त्याचे एक चित्र कित्येक वर्षे नेहमी माझ्याजवळ आहे.  याच्या उलट दक्षिण हिंदुस्थानातील कोरीव काम व इत्थंभूत कथाप्रसंगांनी भारावलेली प्रचंड मंदिरे पाहून मी अस्वस्थ होतो, मला बरे वाटत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel