देशाच्या प्रत्येक प्रांतातून प्रांतिक सरकारांनी राज्यकारभार चालविला होताच, तेव्हा युध्दकाळापुरते तात्पुरते एक लोकपक्षीय मध्यवर्ती सत्ता चालविणारे राज्ययंत्र निर्माण करणे सोपे गेले असते.  या मध्यवर्ती मंडळाने युध्दाकरिता राष्ट्राने करावयाची देशातील कामे जनतेत उत्साह निर्माण करून तत्परतेने चालविली असती, राष्ट्रातील सैन्याशी उत्तम सहकार्य केले असते, व एका बाजूला देशातील जनता व प्रांतीय सरकारे व दुसर्‍या बाजूला ब्रिटिश सरकार या दोहोंमध्ये हे लोकपक्षीय मध्यवर्ती मंडळ दुव्यासारखे राहून त्याने दोन्ही बाजू सांधल्या गेल्या असत्या.  राज्यघटनेबाबतच्या इतर अडचणींचा विचार युध्द संपल्यानंतर करता आला असता; अर्थात त्या अडचणींचा निकाल लावण्याचा प्रयत्न अगोदरपासून सुरू करणे इष्टच होते.  युध्द संपले म्हणजे देशोतील जनतेच्या प्रतिनिधींनी पक्की राज्यघटना तयार केली असती व इंग्लंड व हिंदुस्थान यांच्या संबंधाबाबत इंग्लंडशी रीतसर तह केला असता.

देशातील जनतेपैकी बहुतेक कोणालाच या युध्दात जे आंतरराष्ट्रीय प्रश्न उपस्थित झाले होते त्यांची पुसटसुध्दा कल्पना नव्हती, व ब्रिटिश सरकाने स्वीकारलेल्या प्रस्तुतच्या धोरणाचा त्यांना राग येऊन तो ते बोलून दाखवीत होते.  अशा वेळी इंग्लंडला सहकार्याचा हा पर्याय देऊ करणे काँग्रेस कार्यकारी समितीला सोपे नव्हते. दोन्ही पक्षांत इतक्या वर्षांचा जो अविश्वास होता, एकमेकाबद्दल मनात शंकाकुशंका होत्या, ते सारे जादू केल्यासारखे एखाद्या शब्दाने नाहीसे होण्यासारखे नव्हते हे आम्हाला कळत होते, पण आम्हाला अशी आशा वाटे की, निदान या युध्दाच्या प्रसंगाने निकड लागल्यामुळे इंग्लंडातील नेत्यांचे मन पालटून ते त्यांच्या साम्राज्यशाहीच्या चाकोरीतून बाहेर निघतील, दूरवरचा विचार पाहून आमचे म्हणणे ऐकतील, व तसे करून या दोन देशांतल्या फार वर्षांच्या वैरभावाचा अंत करून हिंदुस्थान देशातील जनतेचा सारा उत्साह, सारी साधनसंपत्ती युध्दाच्या कामी लावायला मोकळी करतील.

पण हे घडून येण्याचा योग नव्हता.  त्यांनी आमच्या म्हणण्याला उत्तर दिले ते म्हणजे आम्ही जे काही मागितले ते सर्वस्वी नाकारणे.  मित्र व सहकारी म्हणून हिंदुस्थानला वागवावयाची त्यांची इच्छा नव्हती.  त्यांच्या हुकमाप्रमाणे निमूटपणे काम करणारे गुलाम म्हणून आमच्याकडून त्यांना काम घ्यायचे होते असे आम्हाला स्पष्ट दिसू लागले.  इंग्लंडचे नेते व आम्ही, दोघेही, 'सहकार्य' हा शब्द वापरीत होतो, पण त्या शब्दाचा अर्थ प्रत्येकाचा वेगळा होता.  आमच्या अर्थाने सहकार्य म्हणजे बरोबरीच्या नात्याने खांद्याला खांदा लावून, दोस्त म्हणून काम करणे तर त्यांचा अर्थ त्यांनी आज्ञा करावी व ती आम्ही निमूटपणे पाळावी.  जे सारसर्वस्व म्हणून आजवर आम्ही उराशी बाळगून त्याकरिता झगडलो ज्या ध्येयाने आमचे जिणे थोडेफार तरी सार्थ झाले, ते सोडून दिल्याशिवाय त्याचा विश्वासघात केल्यावाचून ब्रिटिश नेत्यांचे म्हणणे मान्य करणे शक्य नव्हते, व आमच्यापैकी कोणी हा विश्वासघात करून आमचे ध्ये टाकून द्यावयाला तयार झालेच असते तरीसुध्दा जनता आमच्या मागे आली नसती, आमचे नेतृत्व तिने मानले नसते. आम्ही ब्रिटिश नेत्यांचे म्हणणे मान्य केले असते, तर आम्ही एकाकी निराधार पडलो असतो. राष्ट्रीय वृत्तीच्या प्रत्यक्ष प्रवाहात नाही व आंतरराष्ट्रीय कल्पनाप्रवाहातही नाही अशी आमची गत झाली असती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel