मुस्लिम लीगमधील स्वत:च्या अनेक सहकार्‍यांपेक्षा जनाब जिना हे अधिक प्रगतिशिल असे आहेत.  खरोखर या सर्वांहून जिना शतपट अधिक मोठे आहेत.  बुटबैंगणामधील ते महापुरुष आहेत आणि म्हणूनच त्यांचे नेतृत्व अपरिहार्य झाले आहे.  व्यासपीठावरून त्यांनी स्वत:च आपल्या सहकार्‍यांचा संधिसाधुपणा, त्यांच्यात कधी कधी दिसून येणारी हीन वृत्ती यासंबंधी अत्यंत नापसंती व्यक्त केलेली आहे.  मुसलमानांतील पुढारलेले, त्यागी आणि धैर्यशील लोक राष्ट्रसभेत राहून तिच्या द्वारा कार्य करीत आहेत ही गोष्ट जिनांनाही माहीत आहे.  परंतु दैवाची घटनाच अशी, एकंदर परिस्थितीचा बनावच असा झाला की, ज्यांच्याविषयी जिनांना फारसा आदर नाही अशांच्या मध्येच ते फेकले गेले.  ते त्यांचे पुढारी आहेत, परंतु त्यांच्या प्रतिगामी विचारसरणीचे गुलाम होऊनच जिनांना त्या सर्वांचे कडबोळे एकत्र करता आले आहे.  ते नाखुषीने असे गुलाम झाले आहेत असे नाही.  त्यांचा बाह्य आविर्भाव अर्वाचीन दिसला तरी विचाराने ते प्रतिगामीच आहेत.  अर्वाचीन राजकीय विचार किंवा प्रगतीचा ज्यांना गंधही नव्हता अशा जुन्या पिढीतच जिना मोडतात.  आजच्या राजकीय घडामोडींवर आर्थिक प्रश्नांनी घनदाट छाया पसरलेली असूनही जिनांचे त्याबाबतीत संपूर्णपणे अज्ञानच आहे असे दिसून येते.  पहिल्या महायुध्दानंतर दुनियेभर जे फेरफार झाले, त्यांचा जिनांवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.  राष्ट्रसभेने जेव्हा राजकीय दृष्ट्या पुढे झेप घेतली, त्याच वेळेस नेमके जिना तिला सोडून गेले.  राष्ट्रसभेची दृष्टी जसजशी अधिकाधिक आर्थिक आणि जनताविषयक होऊ लागली, तसतशी तफावत आणखी वाढतच गेली.  परंतु एका पिढीपूर्वी जिना जेथे उभे होते तेथेच अद्यापही ते उभे आहेत.  त्यांच्या विचारांत बदल नाही, वाढ नाही, एवढेच नव्हे तर ते काहीसे मागेच गेले आहेत.  कारण आज हिंदुस्थानची एकता आणि लोकशाहीचा ते धिक्कार करीत आहेत.  ते म्हणतात, ''पाश्चिमात्य लोकशाहीच्या बाष्कळपणाच्या विचारांवर आधारलेल्या कोणत्याही शासनपध्दतीखाली मुसलमान राहू इच्छिणार नाहीत.''  ज्या गोष्टी ते पूर्वी सांगत होते, त्या बाष्कळपणाच्या आहेत, हे समजून यायला जिनांना इतकी वर्षे लागली अं !

मुस्लिम लीगमध्ये जिना एकाकी भासतात.  अत्यंत परिचित अशा सहकार्‍यांपासूनही ते अलग राहतील.  त्यांच्याबद्दल सर्वत्र आदर आहे. परंतु हा दूरचा आदर आहे.  त्यांच्याविषयी प्रेम वाटण्याऐवजी भीती वाटते, दरारा वाटतो.  राजकारणी मुत्सद्दी या नात्याने त्यांची योग्यता नि:संशय मोठी आहे.  परंतु ती त्यांची योग्यता हिंदुस्थानातील आजच्या ब्रिटिश सत्तेच्या विशिष्ट परिस्थितीशी बांधली गेली आहे.  ते वकिली बाण्याचे मुत्सद्दी म्हणून शोभतात.  ते हिकमती आहेत, डावपेच खेळणारे आहेत.  राष्ट्रवादी हिंदुस्थान आणि ब्रिटिश सत्ता यांच्यातील तराजूचा तोल धरणारा मी आहे अशा दृष्टीने त्यांची कारवाई चालू असते.  परिस्थिती जर बदलली आणि ती बदलणारच, राजकीय आणि आर्थिक स्वरूपाच्या सार्‍या प्रश्नांना जिवांना जर तोंड देण्याची पाळी आली तर त्यांची पात्रता त्यांनाही कोठवर पुरेल याची वानवाच आहे.  कदाचित त्यांनाही याविषयी शंका वाटत असेल.  अर्थात स्वत:विषयीचे त्यांचे मत लहानसहान नाही ही गोष्ट निराळी.  फेरफार होऊ नयेत, आहेत तोच जमाना पुढे चालावा असे जे त्यांना वाटते त्याचे कारण बहुधा हेच असावे.  ते चर्चा टाळतात.  ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी प्रश्नांची गंभीरपणे साधकबाधक चर्चा करण्याची त्यांची तयारी नसते.  आजच्या त्यांच्या सिंहासनावर ते शोभत आहेत; आजच्या नमुन्यात बसत आहेत, परंतु नवीन जमाना आला म्हणजे ते किंवा दुसरे कोणी तेथे नीट बसू शकतील किंवा नाही याची शंकाच आहे.  कोणत्या ध्येयासाठी ते धडपडत आहेत, कोणती प्रेरणा, कोणती भावना यांना हलवीत आहे ?  का कोणतीही सार्वभौम प्रेरणा वा भावना मनात नसूनही गमतीच्या राजकारणातील बुध्दिबळाचा डाव खेळण्यात त्यांना आनंद वाटत आहे ? ''बस्स, शह दिला'' असे म्हणण्यात त्यांना आनंद वाटतो ?  राष्ट्रसभेविषयी त्यांच्या मनात केवळ तिरस्कार आणि द्वेष आहे असे दिसते आणि ही भावना वर्षानुवर्षे वाटतच आहे.  त्यांना तिटकारा कशाचा आहे, त्यांना काय करायला आवडत नाही या गोष्टी उघड आहेत.  परंतु त्यांना आवडते काय ?  एवढ्या शक्तीचा आणि चिकाटीचा हा पुरुष केवळ अभावरूप होऊन बसला आहे.  त्यांचे सारे अकरणरूप करणे, ''नकार'' हेच प्रतीक त्यांना शोभते.  आणि म्हणून त्यांचे विधायक स्वरूप समजून घेणार्‍या माणसाचे प्रयत्न अपयशी होतात; कारण ते विधायक स्वरूप कोठे सापडत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel