पोलाद लवचिक करण्याची कला हिंदुस्थानात फार पूर्वीपासून माहीत होती, आणि परदेशात हिंदी पोलादी व लोखंडी मालाची, विशेषत: युध्देपयोगी वस्तूंची फार किंमत होती.  इतरही अनेक धातू माहीत होते व त्यांचा उपयोग केला जाई.  औषधासाठी म्हणून अनेक धातू काही क्रिया करून, सिध्द करून रसायन वगैरे प्रकारांनी त्यांचा उपयोग केला जाई.  औषध-योजनाशास्त्र चांगलेच वाढले होते.  अर्क व भस्म नानाप्रकारे तयार करण्याचे ज्ञान प्रचलित होते.  त्या शास्त्राला आधार जरी जुनेच ग्रंथ होते, तरी थेट मध्ययुगीन कालापावेतो प्रत्यक्ष प्रयोग करून करून त्या प्रयोगांत खूप सुधारणा झाली होती.  शरीर-रचनाशास्त्र आणि शरीर-विज्ञानशास्त्र- दोहोंचा बराच अभ्यास झालेला होता.  हार्वेच्याही पूर्वी पुष्कळ वर्षे रुधिराभिसरणाचे तत्त्व हिंदी वैद्यास माहीत होते.

विद्यापीठातील अभ्यासक्रमात ज्योतिर्विद्या हा कायम विषय असे आणि कुंडलीविज्ञानही त्यातच येई.  अत्यन्त बिनचूक पंचांग तयार करण्यात आले होते, ते आजही लोक वापरतात.  हे सौर पंचांग असून महिने मात्र चांद्र आहेत.  त्यामुळे अधिक महिना धरावा लागतो.  इतर देशांतल्याप्रमाणे पंचांगव्यवस्था मुख्यत: ब्राह्मणांकडे, धर्मोपदेशकांकडे होती.  निरनिराळे उत्सव, ॠतुमहोत्सव, सूर्य-चंद्रग्रहणांचे अचूक काळ (कारण ग्रहणे म्हणजेही पर्वणीच) हे सारे ते ठरवीत, ते सांगत.  पंचांगज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी समाजात नाना रूढी, नाना समजुती वाढण्याचा उत्तेजन दिले.  पुष्कळ वेळा स्वत: त्यांचा मात्र पुष्कळ गोष्टींवर विश्वास नसे, परंतु त्या गोष्टी रूढ करून स्वत:ची प्रतिष्ठा त्यांनी वाढविली.  समुद्रावर हिंडणाफिरणार्‍यांस आकाशातील तार्‍यांचे प्रात्यक्षिक ज्ञान हवे असे; त्यांना त्या ज्ञानाचा फार उपयोग होई.  ज्योतिर्विद्येत आपण कोलेल्या प्रगतीचा प्राचीन भारतीयांस बराच अभिमान वाटे.  हिंदी ज्योतिर्विद्यांचे अरबांशीही संबंध होते, अरब ज्योतिर्विद्येचे अलेक्झांड्रिया येथे महत्त्वाचे पीठ होते.

यांत्रिक शोधबोध कितपत होते ते समजायला मार्ग नाही.  परंतु गलबते बांधण्याचा धंदा चांगलाच ऊर्जितावस्थेत होता.  वारंवार यंत्रांचे उल्लेख येतात.  युध्देपयोगी यंत्रांचा विशेष उल्लेख आहे.  काही भोळसट व काही अत्युत्साही लोकांनी यावरून लगेच तर्क केला की, भारतात सर्व प्रकारची अवघड यंत्रविद्या होती.  एवढे खरे, हिंदुस्थान त्या काळात वेगवेगळ्या धंद्यांकरता लागणारी हत्यारे घडविण्यात, रसायनविद्या आणि धातुविद्या यांचा उपयोग करण्यात इतर देशांच्या रेसभरही मागे नव्हता.  आणि यामुळेच व्यापारात हिंदुस्थान अग्रेसर राहिला व अनेक शतके कित्येक देशांतील बाजारपेठा त्याने ताब्यात ठेविल्या.

दुसरीही एक अनुकूल घटना अशी की येथे गुलाम करून वेठीस धरण्याची पध्दती नव्हती.  ग्रीक आणि इतर प्राचीन संस्कृतींच्या विकास-मार्गात तो एक अडथळा असे.  तेथे चातुरर्वर्ण्य होते, त्यात काही दोष होते व ते उत्तरोत्तर वाढतच गेले, पण चातुरर्वर्ण्यातील अत्यंत खालच्या पायरीवरच्या मनुष्याचीही स्थिती गुलामापेक्षा अनंतपटीने बरी होती.  त्या त्या वर्णापुरती सर्वांना समानता असे, सर्वांना मोकळीक असे; प्रत्येक वर्ण, प्रत्येक जात धंदेवाईक होती; आणि त्या त्या विशिष्ट गोष्टीत मग्न असे.  आणि यामुळे त्या त्या धंद्यातील कसब पराकोटीला गेले, हस्तव्यवसाय व कलाकुसरीची कामे या धंद्यातील कारागिरी कळसास पोचली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel