तरी अजूनही लाखो बेकार व्हायचे बाकी राहिले होते.  जसजसे ब्रिटिश धोरण अधिकाधिक अंतर्गत भागात जाऊन पोचू लागले, तसतसे तेथेही बेकारीचे भूत थैमान घालू लागले.  या कोट्यवधी लोकांना कामधंदा उरला नाही.  त्यांचे कसब, त्यांची कला केवळ निरुपयोगी झाली.  सारे आता शेतीकडे वळले, कारण अद्याप जमीन होती.  परंतु शेतीत आधीच भरपूर लोक कामाला होते.  तेथे आणखी लोक खपण्यासारखे नव्हते.  त्यात फायदा नव्हता.  त्यामुळे या सगळ्या बेकारांचा बोजा शेतीवर पडला, तो वाढत राहिला व त्याबरोबर देशाचे दारिद्र्य अधिकाधिक वाढू लागून राहणीचे मान फारच खालच्या तळाला जाऊन पोचले.  कारागीर, कसबी लोक निरुपायाने शेतीकडे जाऊ लागल्यामुळे शेती आणि उद्योगधंदे यांच्यातील प्रमाण उत्तरोत्तर बिघडत जाऊन शेती हाच जवळजवळ सर्वांचा धंदा झाला.  कारण धनोत्पादक उद्योग व धंदे काही राहिलेच नव्हते.

हिंदुस्थानातील अधिकाधिक वस्ती खेड्याकडे वळली.  मागील शतकात प्रत्येक सुधारलेल्या देशात लोकसंख्या शेतीकडून उद्योगधंद्यांकडे अधिक गेल्याचे दिसून येईल, परंतु या देशात ब्रिटिश धोरणाचा परिणाम म्हणून उलट गती मिळाली व शहरातून लोक खेड्याकडे चालले.  हे आकडे आपण पाहू तर चटकन सारे ध्यानात येईल.  एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला शेकडा ५५ लोक शेतीवर होते.  युध्दापूर्वीच्या नव्या आकड्याप्रमाणे शेकडा ७४ लोक शेतीवर आहेत असे दिसून येईल.  युध्दात अधिक कामधंदा मिळाला तरीही शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या १९४१ मध्ये अधिकच वाढली, कारण लोकसंख्याही वाढली आहे.  काही थोडी शहरे वाढलेली दिसतात, (लहान शहरांतून वस्ती कमी होऊनच ती वाढली आहेत.)  परंतु याच्यावरून कोणी हिंदुस्थानच्या स्थितीची कल्पना करील तर ती भ्रामक-वरवरची होईल.

हिंदुस्थानातील बेसुमार बेकारी व दारिद्र्य यांचे हे मूळ कारण आहे.  हे दारिद्र्य अर्वाचीन आहे,  ब्रिटिशनिर्मित आहे.  दुसरी जी कारणे हे दारिद्र्य वाढवायला मदत करतात तीही मुळात या दारिद्र्याचाच परिणाम आहेत. दारिद्र्यामुळे नेहमी अर्धपोटी राहावे लागते, सत्त्वांश पोटात जात नाही, जीवनसत्त्वे मिळत नाहीत व त्यातून मग रोग व निरक्षरता वाढतात.  लोकसंख्या अपार वाढणे मोठे दुर्दैव आहे व तिला आळा घालायला हवा आहे.  परंतु इतर उद्योगप्रधान देशांतील लोकसंख्येचे प्रमाण पाहिले म्हणजे तेथले भारी आहे असे मुळीच नाही.  केवळ कृषिप्रधान देशाला मात्र ही लोकसंख्या फार आहे.  योग्य आर्थिक नियोजनाने सार्‍या लोकांना तयार माल करणारे उत्पादक बनविणे शक्य होईल आणि राष्ट्रीय संपत्तीत भर पडेल.  खरोखर तसे पाहिले तर हिंदुस्थानातील लोकसंख्या काही विशिष्ट प्रदेशातच-बंगाल, बिहार, गंगेचे खोरे यातच अधिक दाट आहे.  इतर विस्तृत प्रदेश अद्यापही विरळ लोकवस्तीचे असेच आहेत.  ग्रेट ब्रिटनमधील लोकसंख्या हिंदुस्थानच्या दुप्पट दाट आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

उद्योगधंद्यांतील हे अरिष्ट झपाट्याने शेतीकडेही गेले व तेथे ते कायमचे अरिष्ट होऊन बसले.  जमिनीचे तुकडे छोटे छोटे होऊ लागले व तुकडे पडण्याची ही क्रिया वेड्यावाकड्या मूर्खपणाच्या थरावर जाऊन पोचली.  शेतकीसंबंधी कर्ज वाढले आणि जमिनीची मालकी सावकाराकडे जाऊ लागली.  ज्यांना शेत ना भात अशा शेतीवरील मजुरांची संख्या लाखोंनी वाढली.  हिंदुस्थानावर राज्य करणारे औद्योगिक भांडवलदार होते, तर हिंदुस्थानातील आर्थिक व्यवस्था भांडवलशाहीच्या पूर्वीची होती, एवढेच नव्हे तर त्यातीलही धनोत्पादक अंगे-उपांगे मात्र नष्ट झाली होती.  आधुनिक औद्योगिक भांडवलशाहीच्या तंत्राप्रमाणे मुकाट्याने वागणे एवढेच भारतीयांच्या नशिबी आले, व त्या तंत्रातील फायदा कोणताही पदरात न पडता त्याचे दुष्परिणाम मात्र भोगणे प्राप्त झाले.

औद्योगिक भांडवलशाही प्रचारात येण्यापूर्वी देशात जी आर्थिक व्यवस्था होती त्यातून औद्योगिक भांडवलशाही प्रकारात शिरणे मोठे जिकिरीचे असते.  हे संक्रमण संकटग्रस्त असते व बहुजनसमाजाला त्यामुळे अपार हालअपेष्टा भोगाव्या लागतात.  विशेषत: या देशात हे स्थित्यंतर होण्याची काहीच निश्चित योजना किंवा त्यातले वाईट परिणाम होताहोईतो कमी करण्याची खटपट न होता ज्याला सुचेल ते त्याने करावे अशी मोकळीक राहिल्यामुळे आरंभी लोकांचे फार हाल झाले.  इंग्लंडातही संकमणकाळात असे हाल भोगावे लागले, परंतु तेथे संक्रमण फार झपाट्याने झाल्यामुळे दैन्याचा काळ फार लांबला नाही.  नवीन यंत्रामुळे निर्माण झालेली बेकारी नव्या उद्योगधंद्यांनी नष्ट करण्यात आली.  परंतु तेथेही मानवी हालअपेष्टांच्या स्वरूपात किंमत द्यावी लागली, नाही असे नाही.  फक्त ती किंमत दुसर्‍यांनी दिली, विशेषत: हिंदी जनतेने आपल्या उपासमारीच्या स्वरूपात व दुष्काळ, बेकारी, मरण या त्रिविध रूपांत ही किंमत दिली आहे.  पश्चिम युरोपात जुन्या प्रकारातून यांत्रिक उद्योगधंद्याकडे जे संक्रमण झाले, त्याची किंमत हिंदुस्थान, चीन आणि इतर परतंत्र वसाहती यांतील लोकांनी दिलेली आहे; कारण वसाहतीतील तंत्रावर सत्ता युरोपियनांची होती असे म्हणण्यात काही हरकत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel