चालू काळातही जातिभेदाचे जुलमी जू झुगारून देण्यासाठी मध्यमवर्गीयांत अनेक चळवळी झाल्या.  त्यांचा बहुजनसमाजावर परिणाम झाला नाही असे नाही.  परंतु फारच थोडा झाला.  या सुधारकांची तर्‍हा उघडउघड तोंडावर हल्ला चढविण्याची असे.  पुढे गांधी आले.  त्यांची दृष्टी बहुजनसमाजाकडे होती म्हणून अप्रत्यक्षपणे हल्ला करण्याची जी प्राचीन काळापासून चालत आलेली पध्दती, तिचा त्यांनी अवलंब केला.  तसे पाहिले तर स्वत: गांधींनीसुध्दा जातिभेदावर उघडउघड पुन्हापुन्हा तुटून पडायला कमी केलेले नाही, परंतु तसे करताना त्यांनी मुख्य चार वर्णांच्या वर्णव्यवस्थेच्या मुळात असलेल्या, वर्ग हा गुणकर्मावर ठरविण्याच्या सिध्दंतावर आक्षेप घेतलेला नाही.  जातिभेदाच्या नावाखाली जे खाली गवत माजले आहे व वर फाटे फुटले आहेत ते उपटून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत; आणि असे करीत असता सार्‍या सार्‍या जातिभेदाचा पायाच आपण उखडून टाकीत आहोत याचीही त्यांना जाणीव असे. * त्यांनी तो पाया आज खिळखिळा केला आहे आणि जनतेवर अत्यंत परिणामही झाला आहे.  जनतेपुरते पाहिले तर हा जातिभेदाचा सांगाडा राहीला तर सगळा राहील पण मोडला तर पार मोडेल.  पण गांधीजींच्यापेक्षाही एका मोठ्या शक्तीचा कामाचा सपाटा सुरु आहे.  अर्वाचीन जीवनाची स्थितीच अशी आहे की, प्राचीन काळापासून चालत आलेली ही जीर्ण, चिवट जातिभेदाची प्रथा आता मेल्याशिवाय राहणार नाही.

परंतु आपण इकडे हिंदुस्थानात जातिभेदाशी (जे प्रथम रंगावरूनच निर्माण झाले.)  झगडत असताना तिकडे पश्चिमेकडे नव्यानव्या इतरांना कमी मानून त्यांना दूर ठेवणार्‍या उन्मत्त जाती उगवल्या आहेत.  त्यांची तत्त्वप्रणाली वंशभेदावरून उच्च-नीच अलग ठेवण्याची आहे.  या तत्त्वांना कधीकधी राजकीय किंवा आर्थिक स्वरूप येते व वेळप्रसंगी त्यासंबंधी लोकशाही तत्त्वाचीही भाषा वापरली जाते.

ख्रिस्तापूर्वी सातशे वर्षे याज्ञवल्क्य हा एक थोर ॠषी, एक महान स्मृतिकार होऊन गेला.  त्याने असे म्हटले आहे, नुसत्या धर्मनिष्ठेमुळे आपण सत्प्रवृत्त होत नाही, आपल्या रंगाने (वर्णाने) तर नाहीच नाही, प्रत्यक्ष आचरणात सत्प्रवृत्तीचा अभ्यास पाहिजे.  म्हणून स्वत:च्या बाबतीत जे तुम्ही करणार नाही, ते दुसर्‍याच्याही बाबतीत करू नका.''

--------------------

* जातिभेदासंबंधीचे गांधीजींचे लिहिणे उत्तरोत्तर प्रगतीच्या दृष्टीने अधिक जोरदार असे झाले आहे; अधिक स्पष्ट असे झाले आहे.  पुन:पुन्हा त्यांनी स्वच्छ सांगितले आहे की, ''आज ज्या स्वरुपात जातिभेद आहेत, ते समूळ नष्ट झालेच पाहिजेत. राष्ट्रासमोर त्यांनी जो विधायक कार्यक्रम ठेवला आहे त्यात ते म्हणतात, विधायक कार्यक्रमाचा हेतू  राजकीय, सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य हा नि:संशय आहे.  एका महान राष्ट्राच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील ही अहिंसक क्रांती आहे; ही क्रांती झाली म्हणजे जातिभेद, अस्पृश्यता इत्यादी प्रचलित भोळसट समजुती नष्ट होतील.  हिंदु-मुसलमानांतील भेद हे झाल्या गेल्या इतिहासवजा गोष्टीत जमा होतील.  इंग्रज किंवा युरोपियन यांच्यासंबंधीचे वैरही आम्ही विसरुन गेलेले असू.''  पुन्हा अगदी अलीकडे त्यांनी लिहिले आहे ''ज्या स्वरुपात जातिभेद आहेत त्या स्वरुपात ते आजच्या काळाला शोभेसे नाहीत.  हिंदू धर्म आणि हिंदुस्थान ही जगावीत, दिवसेंदिवस विकसित व्हावीत, म्हणून हे जातिभेद गेलेच पाहिजेत.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel