स्वामी दयानंदांच्याच काळी बंगालमध्ये एक निराळ्याच प्रकारची व्यक्ती होऊन गेली. नवे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या अनेक सुशिक्षितांवर या व्यक्तीच्या जीवनाचा खोल परिणाम झाला.  ती व्यक्ती म्हणजे रामकृष्ण परमहंस ही होय.  रामकृष्ण मोठे पंडित नव्हते.  ते साधे श्रध्दावान, भक्तिमार्गी हाते. सुधारणा म्हणूनच सामाजिक सुधारणा पाहिजे असल्या कल्पनेत त्यांचे फारसे लक्ष नव्हते.  चैतन्यादी हिंदू साधुसंतांच्या मालिकेत गणना व्हावी असे ते होते.  अत्यंत धार्मिक वृत्तीचे असूनही त्यांचे अंत:करण विशाल असल्यामुळे साक्षात्काराच्या संशोधनार्थ ते मुस्लिम व ख्रिश्चन साधूंच्या संगतीतही कैक वर्षे राहिले, व त्यांच्या साधनेप्रमाणे तंतोतंत वागले.  कलकत्त्याजवळ दक्षिणेश्वराच्या मंदिरात त्यांनी पुढे वास्तव्य केले.  त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व, त्यांचे दिव्य चारित्र्य यामुळे हळूहळू लोकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले.  जे जे त्यांच्याकडे जात आणि कोणी कोणी त्यांच्या भोळ्या भक्तिभावाची टिंगल करण्याच्या हेतूनेही आलेले असत- त्यांच्यावर अपार परिणाम होई, आणि पूर्णपणे पाश्चिमात्य झालेल्यांनाही वाटे की येथे असे काहीतरी आहे जे आपणास कधीच कोठे आढळले नाही.  धर्मतत्त्वांपैकी श्रध्दा ठेवण्याजोगी जी महत्त्वाची मूलतत्त्वे आहेत तीच विशेषत: सांगून हिंदुधर्माच्या व तत्त्वज्ञानाच्या विविध स्वरूपांची एकवाक्यता त्यांनी दाखविली.  त्यांच्या स्वत:च्या ठायी ही विविध रूपे एकरूप झाली होती.  खरोखर पाहिले तर इतर सर्व धर्मही त्यांच्या कक्षेत येत होते.  धर्मपंथाचा अभिमान धरून आपला पंथच खरा, बाकी खोटे असल्या वृत्तीचा त्यांचा विरोध होता.  या सर्व वाटा अखेर सत्याकडेच वळतात असे त्यांचे निश्चित मत होते.  आशिया, युरोपमधील पूर्वीच्या संतांच्या कथा आपण ऐकतो, त्याचप्रमाणे ते होते.  अर्वाचीन जीवनाच्या संदर्भात त्यांची शिकवण समजणे कठीण आहे; परंतु भारताच्या विविधरंगी चित्रात ते शोभून दिसतात, व ईश्वरी तेजाचा अंश असलेला सत्पुरुष या भावनेने त्यांच्या ठायी अनेकजण भक्तिभावाने पूज्य बुध्दी ठेवतात.  जे जे त्यांना भेटत त्यांच्या त्यांच्यावर रामकृष्णांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटल्यावाचून राहात नसे, आणि ज्यांनी त्यांना कधी पाहिले नाही, त्यांच्यावरही त्यांच्या जीवनकथेचा परिणाम झाल्यावाचून राहात नाही.  रोमाँ रोलाँनी रामकृष्णांना कधी पाहिले नव्हते.  परंतु त्यांचे आणि त्यांच्या थोर शिष्यांचे—विवेकानंदांचे अशी दोन चरित्रे त्यांनी लिहिली आहेत.

विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधुसमवेत पंथातील अशी रामकृष्ण मिशन ही समाजसेवेची संस्था स्थापिली.  त्यांच्या कल्पनांचे मूळ प्राचीन कालापर्यंत पोचलेले होते व आपल्या देशाला लाभलेल्या वंशपरंपरागत आध्यात्मिक व आधिभौतिक संपत्तीचा त्यांना फार अभिमान वाटे, परंतु जीवनात उद्भवणारे प्रश्न सोडविण्याची त्यांची तर्‍हा मात्र अर्वाचीन होती व एक प्रकारे हिंदुस्थानचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारे सेतू होते.  त्यांचे बंगाली व इंग्रजी भाषेतून केलेले वक्तृत्व प्रभावी असे व त्यांनी बंगालीत रचलेले पद्य व गद्य सहजसुंदर आहे.  ते दिसायला भव्य, रुबाबदार, खंबीर दिसत.  स्वत:विषयी व स्वत:च्या कार्याविषयी त्यांना मोठा आत्मविश्वास वाटे व या आत्मविश्वासाच्या जोडीला धगधगीत उत्साह व आपला देश प्रगतिपथावर पुढे लोटण्याची कळकळ यांची भर पडली.  हिंदू समाज भांबावून जाऊन धर्माबाबत खिन्न होता व त्याचे मन कचरत होते.  त्या समाजाला त्यांच्या रूपाने शक्तिवर्धक अमृत भेटले, आत्मप्रत्यय आला, आपल्या धर्माचे मूळ किती प्राचीन आहे ते थोडेफार कळले.  सन १८९३ मध्ये ते शिकागो येथील सर्वधर्म परिषदेला गेले, ते तिकडेच अमेरिकेत एक वर्षभर फिरले व परत येताना युरोपवरून प्रवास करून अथेन्स व कॉन्स्टँटिनोपलला जाऊन शिवाय इजिप्त, चीन व जपानातही ते जाऊन आले.  ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनामुळेच नव्हे, तर त्यांच्या व्याख्यानातले तात्पर्य व ते मांडताना योजलेली वक्तृत्वशैली यामुळे थोडीफार खळबळ उठे.  या हिंदू संन्याशाचे एकदा दर्शन झाले की तो किंवा त्याचा संदेश विसरून जाणे कठीणच.  अमेरिकेत त्यांना 'हिंदू झंझावात' म्हणत.  पाश्चिमात्य देशातील या प्रवासाने त्यांच्यावरही खूप परिणाम झाला.  ब्रिटिशांच्या चिकाटीची व उद्योगीपणाची ते स्तुती करीत व अमेरिकन लोकांतील रसरशीत जिवंतपणा व सर्वांना समान लेखण्याची वृत्ती यांचे ते कौतुकाने वर्णन करीत.  हिंदुस्थानातील एका मित्राला त्यांनी लिहिले, ''कोणतीही कल्पना मांडून पुढे चालवायला अमेरिका हे उत्कृष्ट क्षेत्र आहे.''  परंतु पश्चिमेकडील देशांत धर्माचे जे बाह्य परिणाम झालेले दिसले ते काही चांगले नाहीत असे त्यांचे मत होऊन भारतीय तत्त्वज्ञान व अध्यात्मावरील त्यांची श्रध्दा दृढ झाली.  भारताचा अध:पात झाला असला तरी येथेच ईश्वरप्राप्तीकरता अवश्य तो प्रकाश आहे असे त्यांना वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel