जगातील घडामोडींमुळे आणि समान हितसंबंधामुळे आशियातील राष्ट्रे पुन्हा एकमेकांकडे पाहू लागली आहेत.  युरोपियनांच्या वर्चस्वाची सद्दी संपली आहे, व जसे एखादे वाईट स्वप्न संपावे, निघून जावे त्याप्रमाणे ही सत्ता नाहीशी झाली आहे, नाहीशी होत आहे.  आणि प्राचीन स्मृती जागृत होऊन आपल्या पूर्वीच्या मैत्रीची, पूर्वीच्या समान साहसांची आपणांस आठवण करून देत आहेत.  हिंदुस्थान ज्याप्रमाणे चीनला जवळ करू पाहात आहे त्याप्रमाणे इराणलाही जवळ घेईल.

दोन महिन्यांपूर्वी अलाहाबादला इराणी सांस्कृतिक शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणाले, ''इराणी आणि हिंदी हे भाऊ-भाऊ आहेत.  एक इराणी कहाणी अशी आहे की, दोन भावांची ताटातूट होऊन, एक भाऊ पूर्वेकडे गेला, एक पश्चिमेकडे गेला,  दोघा भावांच्या कुटुंबियांना एकमेकांची काहीच माहिती राहिली नाही, नातेसुध्दा विसरून गेले.  पण हे कुटुंब एकत्र असताना जी काही गाणी म्हणत त्यातले मात्र काही सूर दोन्ही कुटुंबांच्या लक्षात राहून तेवढेच काय ते त्या दोन्ही कुटुंबांचे एकच राहिले व ते सूर बासरीवर काढीत अनेक शतकांनंतर या सुरावरून या त्यांच्या वंशजांना आपण एके काळी एक होतो हे समजून येऊन ओळख पटली व ते पुन्हा एक झाले.  या गोष्टीतल्याप्रमाणे आम्ही हिंदुस्थानात प्राचीन गीते आमच्या बासरीवर वाजवून दाखवायला आलो आहोत; ते सूर ऐकून हिंदी लोकांना आठवण येऊन हे इराणी आपलेच भाऊ असे ओळखून ते आपल्या या भावांना पुन्हा भेटतील.''

भारत आणि ग्रीस
प्राचीन ग्रीस म्हणजे युरोपियन संस्कृतीचा मूळचा उगमाचा झरा असे समजण्यात येते.  पूर्व आणि पश्चिम यांच्यातील मूलभूत भेदांविषयी कितीतरी लिहिण्यात आलेले आहे.  परंतु मला ते समजत नाही.  त्यातील बरेचसे लिखाण भोंगळ व अशास्त्रीय असून वस्तुस्थितीत त्या लिखाणास फारसा आधार नाही.  आता आतापर्यंत पुष्कळ युरोपियनांची अशी समजूत असे की जगात जे जे काही मोलाचे, किंमतीचे असे आहे त्याचा आरंभ ग्रीस किंवा रोम येथेच झाला.  सर हेन्सी मेन याने कोठेतरी असे म्हटले आहे की सृष्टीतील जगात असे काहीही नाही, की जे मुळात ग्रीक नाही.  युरोपातील प्राचीन भाषांचे पंडित ग्रीक आणि लॅटिन भाषांचाच खोल अभ्यास करीत.  त्यांना हिंदुस्थान किंवा चीनविषयी फारच कमी ज्ञान असे.  तीही प्रो. इ. आर. डॉइस याने म्हटले आहे की, ''ग्रीक संस्कृती पौर्वात्य पार्श्वभूमीवरच उभी आहे, तिच्यापासून ती कधीही संपूर्णपणे अलग नव्हती.  फक्त युरोपीय विद्वानांच्या मनात ही फारकत असे.''

युरोपातील पांडित्य कितीतरी वर्षे ग्रीक, लॅटिन आणि हिब्रू यांच्यापुरतेच मर्यादित होते.  या मर्यादित ज्ञानातून त्यांच्यासमोर जगाचे जे चित्र उभे राही ते फक्त भूमध्यसमुद्रालगतच्या जगाचे असे.  प्राचीन रोमनांची समजून असे तशीच याही लोकांची बरीचशी असे; अर्थात काही फरक, काही नवीन कमी अधिक त्यांना करावे लागत असे.  इतिहास, भौगोलिक राजकारण, संस्कृती-सुधारणांची वाढ या सर्वांच्या पाठीमागे ही समजूत उभी असे.  इतकेच नव्हे, तर विज्ञानाच्या वाटेतही ही समजूत आडवी आली.  प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल या दोघांची युरोपियनांच्या मनावर पकड होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel