इंग्लंड हिंदुस्थानात आले.  राणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला इ.सन १६०० मध्ये सनद दिली तेव्हा शेक्सपिअर हयात होता, लिहीत होता.  इ.सन १६११ मध्ये बायबलची अधिकृत अशी इंग्रजी भाषेतील प्रत प्रसिध्द झाली.  १६०८ मध्ये मिल्टन जन्मला, आणि हॅम्पटन्, क्रॉमवेल आणि राजकीय क्रांती यांचा काळा आला.  १६६० मध्ये शास्त्राची वाढ होण्यास कारणीभूत झालेली रॉयल सोसायटी ऑफ सायन्स स्थापन झाली.  त्यानंतर शंभर वर्षांनी १७६० मध्ये धावत्या धोट्याचा शोध लागला आणि मग भराभरा सूत कातण्याचे यंत्र, वाफेचे एंजिन, यांत्रिक माग यांचे शोध लागले.

या दोन इंग्लंडपैकी कोणते इंग्लंड हिंदुस्थानात आले? शेक्सपिअर आणि मिल्टनचे इंग्लंड, उदात्त वाङ्मय यांचे इंग्लंड, शौर्यधैर्याचे इंग्लंड, राजकीय क्रांती आणि स्वातंत्र्यार्थ लढा करणारे इंग्लंड, ज्ञानविज्ञानाचे आणि औद्योगिक प्रगतीचे इंग्लंड येथे आले की, रानटी फौजदारी कायदेकोड करणारे, पशूसम वागणारे, मिरासदारीचे व वतनदारीचे रक्षण करू पाहणारे प्रतिगामी सरंजामशाही इंग्लंड इकडे आले? कारण दोन इंग्लंडे आपणांस दिसतात.  कोणताही देश घेतला तरी तेथे संस्कृतीची राष्ट्रीय चारित्र्याची ही दोन रूपे आपणांस दिसून आल्याशिवाय राहात नाहीत.  एडवर्ड थॉम्प्सन लिहितो : ''इंग्लंडमध्ये उच्च संस्कृती आणि सामान्य संस्कृती यांत नेहमी अपरंपार अंतर आहे.  कोणत्याही देशाशी तुलना केली तरी या बाबतीत आपल्याकडील अंतराइतके अंतर आढळणार नाही; आणि हे अंतर इतक्या आस्ते कदमांनी कमी होत आहे की ते कमी होत आहे असे वाटतही नाही.'' *

-----------------------
*  एडवर्ड थॉम्प्सनच्या ''Making of Indian Princess.'' 'हिंदी संस्थानांची निर्मिती' (१९४३), सर पुस्तकातील उतारा, पृष्ठ २६४.

ही दोन्ही इंग्लंडे शेजारीशेजारी राहतात, एकमेकांवर परिणाम करीत असतात.  ती अलग करता येणार नाहीत.  दुसर्‍या भागाला अजिबात विसरून एकच भाग हिंदुस्थानात येणे शक्य नव्हते.  परंतु कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीत एकाच भागाला प्रामुख्याने भाग घेता येतो; दुसर्‍या भागावर तो कुरघोडी करतो, आणि इंग्लंडमधील प्रतिगामी आणि अनिष्ट असा जो भाग, त्यानेच या देशात सत्ता गाजवायला येणे हे अपरिहार्यच होते.  असे करीत असताना या देशातीलही प्रतिगामी व अनिष्ट भागाशी त्याने अधिक संबंध ठेवणे, त्यांना उत्तेजन देणे ही गोष्ट क्रमप्राप्तच होती.

अमेरिकेने स्वातंत्र्य मिळविले व हिंदुस्थानचे स्वातंत्र्य गेले ह्या घटना जवळजवळ एकाच वेळी घडल्या.  गेल्या शेदीडशे वर्षांत अमेरिकेने केलेली अवाढव्य प्रगती पाहून आणि आपल्या देशात जे काही झाले आहे, आणि जे काही होऊ शकले नाही त्याचे विचार मनात येऊन हिंदी मनुष्य उत्कंठेने, आशाळभूताप्रमाणे अमेरिकेशी आपली तुलना करीत बसतो.  अमेरिकेजवळ पुष्कळ गुण आहेत, आणि आपणांत अनेक उणिवा आहेत ही गोष्ट खरी आहे.  अमेरिकेचा नवी विटी, नवे राज्य असा प्रकार होता. नवीन सारा आरंभ होता, कोर्‍या पाटीवर लिहायचे होते.  जुनी बंधने, अडथळे नव्हते.  हिंदुस्थानात किती प्राचीन आठवणी, परंपरा आणि भानगडी, सारा बुजबुजाट होता.  गोंधळ होता.  तरीही असे वाटते की, ब्रिटनने हिंदुस्थानचा प्रचंड बोजा स्वत:च्या शिरावर जर घेतला नसता, आणि त्यांचे लोक म्हणतात त्याप्रमाणे लोकशाही कारभारात अडाणी असणार्‍या या देशाला लोकशाही कारभाराची कला शिकविण्याची इतकी वर्षे जर धडपड केली नसती तर, शक्य आहे की हिंदुस्थान अधिक स्वतंत्र व अधिक भरभराटलेला झाला असता, इतकेच नव्हे, तर जीवन जगण्यालायक करणार्‍या ज्ञानविज्ञानादी क्षेत्रांत, कलात्मक क्षेत्रातही कितीतरी पुढे तो गेला असता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel