महाभारतात कृष्णाच्या चरित्रातील कथा आहेत, आणि सुप्रसिध्द भगवद्गीता आहे.  गीतेतील तत्त्वज्ञान बाजूला ठेवले तरी इतरत्रही गीतेत मनुष्याच्या सर्वसामान्य जीवनात व राजकारणात न्यायनीती व सदसद्विवेक पाळण्यावर भर दिलेला आहे व सांगितले आहे की, धर्माच्या अधिष्ठानावाचून, धर्माच्या आधाराशिवाय खरे सुख नाही व समाजही एकत्र नांदू शकणार नाही.  समाजाचे कल्याण हेच ध्येय दिले आहे, मात्र ते विशिष्ट लोकसमूहाचे कल्याण नव्हे तर सर्व जगाचे; कारण ''अखिल मानवजाती म्हणजे अनेक अवयवांचे मिळून एक झालेले अतएव स्वावलंबी सजीव शरीर आहे.''  सत्यनिष्ठा, आहिंसा अशी काही मूलभूत तत्त्वे सोडून बाकी धर्मसुध्दा सापेक्ष, काल व परिस्थितीप्रमाणे बदलणारा मानला आहे,  ही मूलभूत तत्त्वे शाश्वत आहेत, त्यांचे रूप बदलत नाही.  पण कर्तव्य किंवा पितृॠण, समाजॠण यासारखी ॠणे वगैरेंचा मिळून मानलेला धर्म युगानुरूप बदलत जातो.  अहिंसेवर गीतेत व अन्यत्र महाभारतात दिलेला भर पाहून लक्ष तिकडे जाते, कारण या तत्त्वाचा व सत्यासाठी हाती शस्त्र घेऊन लढण्याचा उघड विरोध येतो, हे लक्षात घेतलेले दिसत नाही.  महाभारत हे महाकाव्य एका महायुध्दावरच रचलेले आहे.  युध्दाभोवती गुंफलेले आहे.  हिंसा आवश्यक व अपरिहार्य झाल्यावरसुध्दा देहाने कोणतीही दांडगाई न करणे अशी अहिंसेची कल्पना दिसत नाही.  शारीरिक कृत्यापेक्षा त्या कृत्यातील हेतू, भावनेने मन भडकू न देणे, आत्मसंयम, द्वेष व क्रोध यांचे निरोधन या मानसिक वृत्तीचा संबंध अहिंसेत महत्त्वाचा मानला आहे असे उघड स्पष्ट दिसते.

महाभारत म्हणजे अमूल्य रत्नांचे, माणिकमोत्यांचे भांडार आहे.  हिंदी विचारात इतरत्र दिसणारे वैराग्याचे, निवृत्तीचे जे स्वरूप आहे, त्यापेक्षा एक प्रकारे अगदी वेगळे, असे हे महाभारत विविध, विपुल आणि उत्साहाने उसळणार्‍या जीवनाने भरलेले आहे.  महाभारतात ठिकठिकाणी नीतिशास्त्र व सदसद्विचार सांगितलेले आहेत तरी ते काही केवळ नीतिपाठाचे धडे देणारे पुस्तक नाही.  महाभारताच्या शिकवणीचे सार, ''जे तुला अप्रिय आहे ते तू दुसर्‍यांच्या बाबतीत करू नकोस;'' या सुप्रसिध्द वाक्यात आहे. हिंदी मनाचा ओढा व्यक्तीची प्रगती, व्यक्तीचा मोक्ष इकडे असतो, सामाजिक कल्याणाची दृष्टी नसते

महाभारत अन्यत्र सांगते, ''सत्य, संयम, वैराग्य, औदार्य, अहिंसा, पुण्य-निष्ठा ही यशाची साधने आहेत, कुळ किंवा जात नव्हे.''  तसेच, ''प्राणापेक्षा, अमृतत्वापेक्षा सद्‍गुण अधिक थोर आहे, खरे सुख पाहिजे असेल तर तुला दु:ख भोगले पाहिजे.  रेशमी किडा त्याचा कोषसंचय झाला म्हणजे मरतो'', असे म्हणून केवळ धनार्जनावर दृष्टी देणार्‍यांना टोमणा दिला आहे, आणि प्रगतिपर आणि जिवंत जनतेची विशिष्ट खूण दाखविणारा एक संदेश आहे.
''असंतोष: श्रियो मूलम्'', असंतोष हे प्रगतीचे मूळ आहे.

महाभारतात वेदांच्याप्रमाणे अनेक देवदेवता, उपनिषदांचे अद्वैत, त्याचप्रमाणे एकेश्वर मत, द्वैतमत सारे काही आहे.  एकंदर रागरंग पाहता नवनिर्मितीची वृत्ती त्या काळीही चाललेली दिसते, बरेचसे बुध्दिप्रामाण्य आढळते व आपल्याभोवती कुंपण घालून स्वत:ला अलग समजण्याची वृत्ती त्या काळापावेतो अमर्याद झालेली दिसत नाही.  जातिभेद, वर्णभेद मानलेले दिसतात, पण ते अभेद्य दिसत नाहीत.  त्या काळापावेतो सर्वत्र आत्मविश्वासाचे वातावरण जिवंत दिसते.  परंतु पुढे त्यानंतर विजातियांचे जेव्हा हल्ले होऊ लागले आणि जुन्या सामाजिक व्यवस्थेला धोका आहे असे वाटू लागले, तेव्हा आत्मविश्वास डळमळू लागला, व समाज अंतर्यामी एकजूट राहावा, बळकट व्हावा म्हणून अधिक सारखेपणाची, समान आचारविचारांची पुढे जरुरी भासू लागली व नाना विधिनिषेध निर्माण झाले.  पूर्वी गोमांसही चालत असे, आता ते संपूर्णपणे वर्ज्य झाले आहे,  महाभारतात सन्मान्य अतिथीला गोमांस, गोवत्समांस दिल्याचे अनेक उल्लेख आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel