मध्य आशियात खोरासान येथे जन्म झालेला प्रसिध्द इराणी पंडित व प्रवासी अल्बेरूनी अकराव्या शतकात हिंदुस्थानात आला होता.  इस्लामच्या आरंभीच्या काळात बगदाद येथे ग्रीक तत्त्वज्ञान लोकप्रिय असून त्याचा पुष्कळ अभ्यास होत असे, तेथे अल्बेरूनीने त्याचा अभ्यास केला होता.  हिंदी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानात आल्यावर त्याने संस्कृत शिकण्याचा उद्योग केला.  ग्रीक तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांतील साम्य पाहून त्याला आश्चर्य वाटले व हिंदुस्थानवरील आपल्या ग्रंथात दोन्ही तत्त्वज्ञानांची त्याने तुलना केली आहे.  ग्रीक व रोमन ज्योतिषशास्त्रासंबंधी माहिती दिलेल्या संस्कृत ग्रंथांचा त्याने उल्लेख केला आहे.

ग्रीक आणि हिंदी संस्कृतींचा परस्परांवर अपरिहार्यपणे परिणाम होत असला तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राखण्याइतक्या त्या समृध्द व समर्थ होत्या, स्वत:च्या विशिष्ट वृत्तिप्रवृत्त्यनुरूपच त्यांची वेगळी वाढ होत होती.  पूर्वी सारे काही जे शोधबोध लावण्यात आले, ते ग्रीक आणि रोमन लोकांनी लावले असे समजण्यात येऊन, ग्रीक आणि रोमन संस्कृतींपासून जगाने सारे उसने घेतले असे प्रतिपादण्याची प्रवृत्ती असे.  परंतु ही प्रवृत्ती आता उलटली असून जगाच्या संस्कृतीत भर घालण्याचा भारताचा केवढा मोठा भाग आहे ते विशेषेकरून प्रतिपादिले जाते.  प्रो. टार्न लिहितात, ''आशियातील लोकांनी ग्रीकांपासून जे काही घेतले ते बाह्य रूपापुरतेच होते.  अपवादापुरत्या काही नागरिक संघटनांच्या कल्पना सोडल्या तर मूळचे ग्रीक असलेले काहीही आशियाच्या लोकांनी ग्रीकांपासून उचललेले नाही, व मूळ प्रकृती तर नाहीच नाही.  त्या बाबतीत आपण ग्रीकांना पुरून उरू असा आशियावासीयांना आत्मविश्वास होता, आणि तो यथार्थ होता.  ते त्याप्रमाणे खरोखरच पुरून उरले.''  हाच लेखक पुढे आणखी म्हणतो, ''ग्रीक संस्कृतीसमोर स्वत:चे ठाण मांडून उभी ठाकण्याइतकी भारतीय संस्कृती खंबीर होती; परंतु बाबिलोनियन संस्कृतीप्रमाणे परिणाम करण्याइतकी शक्ती तिच्यात नव्हती; जो काही परिणाम भारतीय संस्कृतीने ग्रीक संस्कृतीवर केला असेल तो धार्मिक बाबतीत केला.  तथापि काही बाबतीत या जोडीपैकी भारतीय संस्कृतीच अधिक प्रभाव पाडणारी होती असे म्हणायला सबळ कारणे आहेत.  ग्रीक जगात झालेच नसते तरीही भारतीय संस्कृती आज आहे तशीच असती.  तिच्यात काही उणीव पडली नसती.  फक्त बुध्दाचे पुतळे कदाचित दिसले नसते येवढेच.''

मूर्तिपूजा ग्रीस देशातून हिंदुस्थानात आली हे पाहून गंमत वाटते.  वैदिकधर्म सर्व प्रकारच्या प्रतिमा व मूर्तिपूजेविरुध्द होता.  त्या काळी देवांची मंदिरेसुध्दा नव्हती.  भारतातील अतिप्राचीन धर्मात, वेदकालीन धर्मात मूर्तिपूजेचे काहीसे अस्तित्व असावे असे वाटते, परंतु तो प्रकार सर्वत्र रूढ झालेला नव्हता.  आरंभीचा बौध्दधर्मही या गोष्टीच्या विरूध्द होता व बुध्दांच्या मूर्ती किंवा पुतळे करू नयेत म्हणून मुद्दाम निषेध आहेत.  परंतु अफगाणिस्थान व त्याच्या आसपासच्या प्रदेशात ग्रीक कलांचे प्रभुत्व प्रभावी होते, आणि शेवटी तो प्रभाव विजयी ठरला.  तरीही प्रथम प्रथम बुध्दांचे पुतळे नव्हते.  पूर्वजन्मी बुध्द बोधिसत्त्व होते, त्या बोधिसत्त्वाचे पुतळे करण्यात आले.  परंतु नंतर प्रत्यक्ष बुध्दांच्याही मूर्ती व पुतळे दिसू लागले, आणि वैदिक धर्मात मूर्तिपूजा नव्हती ती हिंदुधर्मात शिरून देवदेवतांची मंदिरे दिसू लागली.  हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषेत मूर्तीला जो बुत् शब्द आहे तो बुध्द शब्दापासूनच आलेला आहे.

या सृष्टीत, या विश्वात व आपल्या या जीवनात एक प्रकारचे ऐक्य आहे, आणि ते शोधावे अशी मानवी मनाला सतत तहान आहे असे दिसते.  ही इच्छा योग्य की अयोग्य हा प्रश्न निराळा; परंतु मानवी मनाची अत्यंत जरुरीची अशी एखादी गरज त्यामुळे तृत्प होत असली पाहिजे.  प्राचीन तत्त्वज्ञानी हे ऐक्य सदैव शोधीत होते, आणि अर्वाचीन शास्त्रज्ञही अंत:प्रेरणेने या शोधाकडे धावत आहेत.  आपल्या नाना योजना व नाना आराखडे, आपल्या शिक्षणाची ध्येये, राजकीय व सामाजिक संघटनेचे उद्देश या सर्वांच्या पाठीमागे ऐक्य शोधून काढण्याची एक प्रकारचा मेळ, सुसंवादित्व, एकत्व शोधून काढण्याची ही वृत्ती दिसेल.  आजकालचे काही प्रतिष्ठित विचारवंत व तत्त्वज्ञानी सांगतात की, ही मूलभूत कल्पना खोटी आहे,  हे विश्व म्हणजे एक आकस्मिकता आहे; या हेतुहीन विश्वात मेळ नाही, ऐक्य नाही.  कदाचित हे म्हणणे खरेही असेल.  परंतु या चुकीच्या कल्पनेच्या शोधासाठी का होईना, ग्रीस देशात, भारतात, आणि अन्यत्र जे अनंत प्रयत्न झाले ते विफल झाले नाहीत.  त्या प्रयत्नांतून प्रत्यक्ष फायदे झाले आहेत, जीवनात एक प्रकारचा समतोलपणा, समृध्दता, सुसंवादित्व त्यामुळे आली आहेत यात शंका नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel