त्यानंतर लिहिलेल्या आपल्या शेवटच्या पत्रात काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटले होते की, ''आम्ही केवळ काँग्रेसच्या हाती राजसत्ता कशी येईल एवढेच घेऊन बसलो नाही.  आमची इच्छा अशी की, सबंध हिंदी जनतेला स्वातंत्र्य मिळावे, त्या जनतेच्या हाती राजसत्ता यावी.  आमची अशी खात्री आहे की, ब्रिटिश सरकारने आमच्यात दुहीला उत्तेजन देण्याचे आपले धोरण सोडून दिले तर आम्ही सारे हिंदी, कोणत्याही पक्षोपपक्षाचे असलो तरी, एकत्र जमून पुढे कसे चालावे, काय करावे ते एकविचाराने ठरवू, ते आम्हाला शक्य आहे. पण दुर्दैव असे की, आजच्या ह्या घोर संकटप्रसंगीदेखील ब्रिटिश सरकार आपले जेथे तेथे मोडता घालण्याचे धोरण सोडू शकत नाही.  जिकडून तिकडून शत्रूंची चढाई सुरू आहे व देशावर स्वारी होण्याचे भय डोक्यावर येऊन ठेपले आहे तरी, हिंदुस्थानचे संरक्षण कसे करावे यापेक्षा, हिंदुस्थानवरचे आपले राज्य आपल्या हातातून सुटू नये म्हणून शक्य तितके दिवस राज्यकारभाराला कसेतरी कवटाळून बसण्याची व त्याकरिता या देशात भांडणे व दुही माजविण्याची विवंचना ब्रिटिश सरकारला अधिक आहे असा निष्कर्ष काढण्यावाचून आम्हाला गत्यंतर नाही.  काँग्रेसला व सार्‍या हिंदी लोकांना विवंचना लागली आहे ती हिंदुस्थानचे संरक्षण कसे करावे, त्याकरिता काय पूर्वयोजना करावी, एवढीच आहे व त्या एकाच विचाराच्या कसोटीवर आम्ही प्रत्येक गोष्टीची पारख करतो.''

देशाचे संरक्षण कसे करावे याबद्दलचे काँग्रेसचे म्हणणे त्यांनी याच पत्रात दिले होते, ते असे, ''येथील सरसेनापतींना जे ठराविक अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर कोणीही काहीही बंधने सुचविलेली नाहीत.  उलट याच्याही पलीकडे जाऊन आम्ही असे म्हणत होतो की, सरसेनापतींनाच युध्दमंत्री म्हणून काही जादा अधिकार देण्याला आम्ही तयार आहोत.  पण संरक्षणाबद्दलच्या आमच्या व ब्रिटिश सरकारच्या कल्पना भिन्न आहेत हे स्पष्ट दिसते.  आमच्या मते संरक्षण म्हणजे स्वदेशाचे संरक्षण असे त्याला राष्ट्रीय स्वरूप देऊन हिंदुस्थानातल्या प्रत्येक मनुष्याने त्याचा भार उचलायला हात लावला पाहिजे असे जनतेला आवाहन करावे.  आमच्या स्वदेशबांधवांवर भरंवसा ठेवून ह्या महान प्रयत्नात त्यांचे पूर्ण सहकार्य मागावे.  ब्रिटिश सरकारची मुळापासून वृत्ती ही की, हिंदी लोकांचा अजीबात भरंवसा धरू नये.  खरी सत्ता हिंदी लोकांना मिळू देऊ नये.  संरक्षणाबाबत सर्वांत अधिक जबाबदारी राज्य सरकारच्या ब्रिटिश मंत्रिमंडळावर आहे, ते काम इतरांहून विशेषत: त्यांचे आहे, असा तुम्ही दाखला दाखविता.  तुमच्या मंत्रिमंडळावरची ही जबाबदारी, हे कर्तव्य, त्यांना नीट पार पाडायचे असेल तर हिंदी लोकांवर काही जबाबदारी टाकून तिची जाणीव हिंदी लोकांना दिल्याखेरीज गत्यंतर नाही.  याला साक्ष नुकतेच जे जे काय घडत गेले त्याची आहे.  युध्द चालवावयाचे असले तर हे युध्द आपले आहे अशी जनतेची भावना झाली पाहिजे हे हिंदुस्थान सरकारला उमजत नाही.''

काँग्रेसच्या अध्यक्षांचे पत्र मिळल्यानंतर लवकरच सर स्टॅफर्ड क्रिप्स हे विमानाने इंग्लंडला परत गेले.  पण ते जाण्यापूर्वी व तेथे गेल्यावर त्यांनी काही विधाने प्रसिध्द केली ती वस्तुस्थितीच्या अगदी उलट होती व त्याबद्दल हिंदुस्थानात त्वेष निर्माण झाला होता.  हिंदुस्थानातल्या प्रतिष्ठित व आपली जबाबदारी ओळखून असणार्‍या मंडळींनी ही विधाने खरी नाहीत असे म्हणून ती खोडून काढली असतानाही ती विधाने सर स्टॅफर्ड क्रिप्स व इतर काही लोकांनी पुन्हा वारंवार केलीच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel