हिंदुस्थानचे भवितव्य यापुढे काहीही ठरले, इतकेच नव्हे तर अखेर फाळणीचा प्रसंग येऊन देशाचे तुकडे पडले, तरीही देशाच्या वेगवेगळ्या शेकडो बाबतींत एकमेकाशी सहकार्याने वागल्यावाचून गत्यंतर नाही, हे स्पष्ट दिसते.  ज्यांचे एकमेकावाचून काही अडण्यासारखे नाही अशा स्वतंत्र राष्ट्रांनासुध्दा एकमेकाशी सहकार्य करणे भाग आहे.  तेव्हा हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांना म्हणा, किंवा फाळणी झाल्यानंतर देशाचे जे विभाग पडतील त्यांना म्हणा, सहकार्याने चालणे त्याहूनही अत्यंत अवश्य आहे, कारण त्यांचे एकमेकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांनी आपसात जूट करून चालल्याखेरीज त्यांना गत्यंतरच नाही, तसे केले नाही तर त्यांची स्थिती उत्तरोत्तर वाईट होत जाईल, ते विस्कळीत होता होता त्यांचे स्वातंत्र्य नाहीसे होईल.  तेव्हा अगदी व्यवहारी दृष्टीने पाहिले तर पहिला प्रश्न असा निघतो की, देश स्वतंत्र राहून त्याची प्रगती होण्याकरिता अवश्य असे, देशाच्या विविध भागांना एकत्र बांधणारे व सांधणारे, इतकेच नव्हे तर त्या विविध भागांपुरतेच पाहिले तरी त्यांच्या स्वायत्तेची व त्यांची सांस्कृतिक प्रगतीची तरतूद राखणारे असे, कोणते मूलगामी महत्त्वाचे परस्पर सामान्य संबंध आहेत ? या प्रश्नाचा विचार करू लागले तर परचक्रापासून संरक्षण हा महत्त्वाचा विषय सहजच प्रथम लक्षात येतो, आणि त्याच्या मागोमाग त्या संरक्षाकरिता अवश्य असे विविध विषय वाहतूक, दळणवळण, आणि निदान काही थोडेफार अर्थव्यवस्थेचे नियोजनही येते.  याशिवाय देशाचा इतर देशांशी चालणारा अंतर्गत व बहिर्गत व्यापार चालतो त्या व्यापारी मालावर आकारावयाची जकातपट्टी, देशातील चलनपध्दती, व इतर देशांतील चलन व या देशातील चलन यांची अदलाबदल करताना लागणारी हुंडणाबळ, व या देशातील भिन्न विभागांचे दरम्यान होणारा देशांतर्गत व्यापार खुला चालावा म्हणून सबंध हिंदुस्थान देशाच्या दृष्टीने खुल्या व्यापाराची व्यवस्था, हेही विषय देशातील सार्‍याच विभागांना सारख्याच महत्त्वाचे, व परस्परावलंबी म्हणून सगळ्यांचा संबंध जोडणारे आहेत.  सबंध हिंदुस्थानभर अंतर्गत व्यापार खुला राहिला नाही तर सार्‍याच विभागांची वाढ खुंटेल.  असे आणखीही अनेक विषय आहेत.  सबंध देशाच्या दृष्टीने व त्यातील विभागाच्या दृष्टीने, सर्वाच्याच हिताचे असे अनेक विषय आहेत की, त्यांची व्यवस्था सर्वांनी मिळून परंतु एका मध्यवर्ती केंद्राकडून चालविणे भाग आहे.  ही वास्तविक परिस्थिती आहे, व पाकिस्तान अस्तित्वात आले किंवा न आले तरी या खर्‍या परिस्थितीत काही फरक पडणे शक्य नाही.  अर्थात तात्पुरत्या भावनेच्या आहारी जाऊन, त्या भावनेपलीकडे काही पाहायचेच नाही असा हट्ट धरून बसायचे असेल तर गोष्ट वेगळी.  विमानाच्या रहदारीचा व्याप हल्लीच्या काळी जगभर इतका प्रचंड झाला आहे की, तो व्यवसाय वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मालकीचा न ठेवता त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करून त्यावर सर्व राष्ट्रांचे सामुदायिक स्वामित्व चालावे, तितके जमत नसले तर निदान त्या व्यवसायावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण एखाद्या स्वरूपात चालवावे अशी मागणी निकडीने होऊ लागली आहे.  जगातले वेगवेगळे देश ही मागणी मान्य करण्याचा सुज्ञपणा दाखवतील की नाही याबद्दल शंकाच वाटते.  परंतु इतके मात्र निश्चित की, हिंदुस्थानात विमान व्यवसायाची वाढ व्हावयाची तर ती हा देश त्या व्यवसायाच्या दृष्टीने सबंध एकच आहे असे धरूनच करता येणे शक्य आहे.  देशाची फाळणी झाली तर प्रत्येक विभागाला त्या व्यवसायाची वाढ आपापल्यापुरती स्वतंत्र रीतीने करता येणे, कल्पनेतसुध्दा संभवनीय नाही.  हाच प्रकार इतर अनेक व्यवसायांच्या बाबतीतही आहे, कारण आजच अशी स्थिती आहे की, त्यांचा व्याप आजच्या देशांच्या राष्ट्रीय सीमारेषांपलीकडे वाढलेला आहे.  या सर्व व्यवसायांची हवी तेवढी वाढ होऊ देण्याइतका हिंदुस्थानचा विस्तार विशाल आहे, पण त्याचे तुकडे पडले तर मात्र ते शक्य नाही. 

ह्या सर्व वस्तुस्थितीचा विचार केला म्हणजे असा निश्चित, अनिवार्य निष्कर्ष निघतो की, देशाचे तुकडे होवोत न होवोत, पाकिस्तान झाले काय किंवा न झाले काय, हिंदुस्थानात स्वातंत्र्य व प्रगतिपर राज्यसंस्था टिकून जिवंत राहायला राज्यसंस्थेच्या कर्तव्यांपैकीची अनेक मूलगामी महत्त्वाची कर्तव्ये, राज्यसंस्थेच्या त्या अधिकारांची व्याप्ती सबंध हिंदुस्थान मिळून एकच देश आहे या तत्त्वाने चालली पाहिजे; तसे झाले नाही तर देशाचा  जीवनप्रवाह मंद होऊन त्यात ठिकठिकाणी कोंडी पडून साचलेले जीवन कुजू लागेल व सगळीकडे तुकडे पडून, सबंध हिंदुस्थान देशालाच नव्हे तर फाळणी होऊन तुकडे पडलेल्या प्रत्येक विभागालाही आपले राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसण्याचा प्रसंग येईल; या विषयावर मत देण्याची पात्रता असलेल्या एका ख्यातनाम विचारवंताने म्हटले आहे की-''चालू युगात काळाचा ओघ एकाच विविक्षित दिशेने वाहतो आहे, त्याला कोणी अडवून फिरवू शकत नाही, आणि त्यामुळे देशापुढे दोन परस्पर-विरोधी पर्याय उभे आहेत.  देश सबंध एक ठेवला तर त्याच्याबरोबर स्वातंत्र्य, देशाचे तुकडे केले तर त्याबरोबर पारतंत्र्य.'' हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांतांचा, विभागांचा, सगळ्यांचा मिळून जो एक संघ करावयाचा त्याचे स्वरूप काय असावे, त्याला संघ म्हणावे का आणखी दुसरे एखादे नाव द्यावे हा प्रश्न महत्त्वाचा नाही, अर्थात नावालाही स्वत:चे असे काही वेगळेच महत्त्व आहे, नावामुळे मनावर होणारा परिणामही विचारात घेतला पाहिजे.  मुद्दयाची गोष्ट ही की, सबंध हिंदुस्थान एकच आहे या तत्त्वाने चालले तरच जे चालवता येतील असे अनेक व्यवसाय, अनेक प्रकारची कार्ये आहेत.  बहुधा असेच घडण्याचा संभव आहे की, यांपैकी अनेक व्यवसाय, अनेक कार्ये लवकरच आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या नियमबध्द संस्थांच्या ताब्यात जातील.  मानवी व्यापाच्या द्दष्टीने जगातील वेगवेगळ्या देशांमधील दुजाभाव कमी होऊन त्या अर्थी जग आटते आहे, वेगवेगळ्या देशांना एकच प्रकारची अडचण येऊन त्या अर्थी या आटणार्‍या जगात एक देशाची दुसर्‍या देशावर घडी बसते आहे.  आजची स्थिती अशी आहे की, जगातल्या कोणत्याही ठिकाणपासून निघून तेथून सर्वांत दूरच्या ठिकाणी अवघ्या तीन दिवसांत पोचता येते, व असे दिसते की, लवकरच विमानविद्येत वाढ होऊन विमाने हल्ली पृथ्वीपासून जितक्या अंतरावरून अंतरिक्षातून प्रवास करतात त्याहीपेक्षा अधिक अंतरावरच्या स्ट्रॅटॉस्फिअर नावाच्या विशिष्ट थरातून विमानांचा संचार होऊ लागला म्हणजे तीन दिवसांहूनही कमी वेळात हा प्रवास होईल.  यापुढे हिंदुस्थान हे वैमानिक प्रवासाचे एक महत्त्वाचे जागतिक केंद्र होणार.  एका बाजूला आशिया खंडातील पश्चिम बाजूचे देश व त्यापलीकडे युरोपखंड व दुसर्‍या बाजूला ब्रह्मदेश व पलीकडे चीन अशा दोन्ही बाजूंनी रेल्वेचे देळणवळण वाढून त्या साखळीत हिंदुस्थानचाही एक दुवा जोडला जाणार.  हिंदुस्थानपासून जवळच उत्तरेला हिमालयाच्या पलीकडे, औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत वाढ होऊन भरभराटीस आलेला व पुढेही आणखी वाढ करू गेले तर ती करण्याची साधने व शक्ती अंगी असल्यामुळे अपार संपन्न भावीकाल लाभलेला, असा सोव्हिएट रशिया राज्यातला एक प्रदेश येतो.  त्याचाही परिणाम हिंदुस्थानवर होऊन हिंदुस्थानात स्थित्यंतरे अनेक प्रकारची घडणारच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel