हिंदुस्थानातील संस्थानिकांनी युरोपातील लोकशाहीच्या पक्षाला आधार मिळण्याकरिता आपण साहाय्य करण्यास सिध्द आहोत अशा घोषणा केल्या होत्या त्यांचाही समाचार कार्यकारी समितीने आपल्या पत्रकात घेऊन त्या संस्थानिकांना अशी सूचना केली की, त्यांच्या स्वत:च्या संस्थानातूनसुध्दा एकतंत्री अरेरावी कारभार चालू आहे त्या जागी आपापल्या राज्यात त्यांनी लोकशाही राज्यपध्दतीला आरंभ करावा हे या घोषणांपेक्षा अधिक शोभून दिसेल.

समितीच्या या निवेदनात युध्दाच्या कामी सर्व तर्‍हेने साहाय्य करण्याला आपण उत्सुक आहो असे पुन्हा सांगताना भूतकाळी व चालू काळातही ब्रिटिशांचे जे धोरण चालू होते त्यात समितीला धोका वाटतो असेही म्हटले होते; व त्याचे कारण असे दिले होते की, त्या धोरणात'' लोकशाही व स्वयंनिर्णय या तत्त्वांचा उत्कर्ष व्हावा असा कोणताही प्रयत्न, किंवा प्रस्तुत काली ब्रिटिश सरकारने या युध्दाच्या निमित्ताने केलेल्या घोषणांना अनुसरून ते हल्ली वागत आहेत किंवा पुढे वागतील याला प्रमाण यत्किंचितही आढळत नाही.''  पुढे मात्र असे म्हटले होते की, ''प्रसंग मोठा आणीबाणीचा आला आहे व मनात विचारसुध्दा जितक्या त्वरेने चालत नाहीत तितक्या त्वरेने गेल्या काही दिवसांत प्रत्यक्षात घटना घडत आहेत हे लक्षात घेऊन या युध्दाबाबत एवढ्यातच कोणताही पक्का निर्णय करण्याची आमची इच्छा नाही; वादाचे विषय काय आहेत, खरी साध्ये काय आहेत, प्रस्तुत काळी व पुढे हिंदुस्थानाला कोणते स्थान देण्यात येणार, यासंबंधी सविस्तर स्पष्टीकरण व्हावयाला त्यामुळे सवड मिळेल.''  म्हणून या निवेदनात समितीने पुढे अशी मागणी केली होती की, ''ब्रिटिश सरकारने या युध्दात लोकशाही, साम्राज्यशाही, व जगात जी नवी समाजव्यवस्था स्थापावयाची म्हणून दृष्टीमोर ठेवली असेल ती पुनर्घटना, यासंबंधी जी साध्ये ठरविली असतील ती कोणती, व विशेषत: हिंदुस्थान देशाच्या बाबतीत ती साध्ये प्रस्तुत काळी ब्रिटिश सरकारच्या मनात कोणती आहेत व ती प्रत्यक्ष कृतीत कशी आणणार, याचा त्या सरकारने निश्चित रूपात निर्देश करावा.  साम्राज्यशाहीचे उच्चाटन करून देशातील जनतेच्या इच्छेनुसार धोरण ठेवणारे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची गणना करावी असे ध्येयही इतर ध्येयांबरोबर ब्रिटिश सरकार मानणार आहे काय ?  कोणतीही घोषणा खरी की खोटी याचा पडताळा पाहावयाचे साधन चालू घटकेला ती घोशण प्रत्यक्ष कृतीने आचारात आणली जाते की नाही हे होय, कारण आजचा वर्तमानकाळच आजची कृती ठरवतो व वर्तमानावरूनच भविष्यात काय आहे त्याचे रंगरूप ठरते.  युध्दे व मानवजातीची अधोगती यांचे मूळ कारण असलेली ही हल्लीच्या जगाची मांडणी जशीच्या तशीच राखण्याच्या हेतूने, व साम्राज्यशाही वृत्तीने हेही महायुध्द चालवले गेले तर त्याचा शेवट शोकपर्यवसायी होईल.''

ज्या प्रतिबंधामुळे गेल्या १५० वर्षांत हिंदुस्थान व इंग्लंड यांच्या दरम्यान तेढ येऊन त्यांचे संबंध विषवत् झालेले होते ते प्रतिबंध काढून टाकावे, तसेच, सार्‍या जनतेच्य उत्साहाचे पाठबळ घेऊन या जागतिक युध्दात भाग घ्यावयाची काँग्रेसला उत्कंठा असूनही स्वातंत्र्याच्या उत्कट इच्छेमुळे तिला ओढून धरावे लागत होते त्यामुळे आलेल्या पेचातून काही मार्ग काढावा या हेतुंनी प्रेरित होऊन तसा काही प्रयत्न करावा म्हणून काँग्रेसने फार काळजीपूर्वक चिकित्सा करून हे निवेदन-पत्रक काढले होते.  त्यात हिंदुस्थान स्वतंत्र झालाच पाहिजे, स्वातंत्र्य हा हिंदुस्थानचा हक्क आहे हे जे विधान होते ते काही नवे नव्हते.  युध्दाची वेळ आली, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणीबाणीची झाली म्हणून केलेले नव्हते.  राष्ट्रीय पक्षाचे आता कितीतरी वर्षांपासूनचे सारे विचार सारी चळवळ या तत्त्वाच्या आधारावर चालली होती.  आज कैक पिढ्या ह्या तत्त्वाच्या आवतीभोवती आम्ही वावरत राहिलो होतो.  हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची अगदी स्पष्ट शब्दात घोषणा करून, नंतर प्रस्तुतच्या परिस्थितीच्या अनुरोधाने, युध्दाच्या दृष्टीने सोय पाहून त्यात चालू परिस्थितीशी जुळण्याजोगे फेरफार केले असते तर काही अडचण येण्यासारखी नव्हती.  वस्तुत: युध्दाला अवश्य म्हणूनच, हिंदुस्थान स्वतंत्र आहे अशी घोषणा करणे अवश्य होते.  हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मान्य करण्याची इंग्लंडला खरी खरी इच्छा झाली असती व इंग्लंडने तसा निश्चय केला असता तर मुख्य अडचण नाहीशी होऊन जे काही किरकोळ मतभेद शिल्लक राहिले असते ते उभयतांच्या विचारे काही तडजोड काढून मिटविता आले असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel