जसजसा मी मोठा होऊ लागलो तसतशी दुसरी चित्रे माझ्या मनात गर्दी करू लागली.  हिंदुस्थानातील आणि युरोपातील अद्‍भुत कथा, ग्रीक पौराणिक कथा, जोन ऑफ आर्कची गोष्ट, एलीस इन वंडरलँडमधील गोष्टी, बिरबल व बादशहाच्या गोष्टी, शेरलॉक होम्स, राजा आर्थर आणि त्याचे सरदार मण्डल, झांशीची राणी-१८५७ च्या हिंदी स्वातंत्र्ययुध्दातील वीरांगना, रजपुतांच्या पराक्रमाच्या, शौर्यधैर्याच्या, धर्मयुध्दाच्या कथा इत्यादींत मन रमले.  या सार्‍या पौराणिक आणि ऐतिहासिक, काल्पनिक आणि खर्‍या अशा गोष्टींना माझे मन भरून गेले, आणि एक प्रकारचा विचित्र गोंधळ उडाला.  परंतु अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून ज्या हिंदी पौराणिक कथा मी ऐकल्या होत्या त्यांचीच पार्श्वभूमी माझ्या मनश्चक्षूंपुढे कायम उभी होती.

माझ्या मनावर इतर शेकडो विविध गोष्टींचा परिणाम होत असताही जर भारतीय पौराणिक कथांची पार्श्वभूमी कायम राहिली तर अशिक्षित हिंदी जनतेच्या मनावर, ज्यांनी इतर फारसे वाचलेले नाही, ऐकलेले नाही अशांच्या मनावर त्या प्राचीन पौराणिक गोष्टींचा किती खोल परिणाम होत असेल त्याची कल्पनाच करावी.  ह्या पौराणिक कथांचा मनावर प्रभाव पडतो तो सांस्कृतिक आणि नैतिकदृष्ट्या फार चांगला असतो.  या गोष्टीतून रूपकथांतून जे एक सौंदर्य आहे; जो एक काल्पनिक प्रतीकवाद, ध्येयवाद आहे, त्या सार्‍याचा नाश करावा, ते सारे फेकून द्यावे असे कोणी म्हणेल तर त्याचा मला अगदी मनापासून राग येईल.

भारतीय दंतकथा व पौराणिक गोष्टी रामायण-महाभारताच्याही पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत.  वेदकाळापासून त्यांचा आरंभ आहे, आणि नानाविध स्वरूपात संस्कृत साहित्यात त्या सर्वत्र सापडतात.  कवी आणि नाटककार या कथांचा भरपूर फायदा करून घेतात आणि त्यांच्यावर स्वत:ची रचना उभी करून, आपल्या स्वत:च्या गोष्टी, आपल्या मधुर कल्पना त्याभोवती गुंफतात.  या काव्यमय कल्पनांत सुंदर दर्जाच्या पायाचा स्पर्श होताच अशोक फुलू लागतो; कामदेव आणि त्याची पत्नी रती यांची त्यांचा मित्र जो वसंतॠतू त्याच्या संगतीतील नाना साहसांचे वर्णन येते, साहसी वृत्तीचा काम आपले पुष्पबाण शिवावर सोडतो परंतु शिवाच्या तृतीयनेत्रातून एकदम भडकून निघालेल्या अग्नीमुळे त्याची राख होते.  परंतु देह जळाला तरी अनंग रूपाने मन:सृष्टीत तो अमर होऊन बसतो.

या बहुतेक प्राचीन कथा-पौराणिक कथा धीरोदात्त आहेत.  दिलेला शब्द पाळावा, सत्य सोडू नये, कितीही आपत्ती कोसळोत, वाटेल ते परिणाम भोगावे लागोत, समोर मृत्यूही उभा राहो, तरी प्रामाणिकपणा, निष्ठा यांचा त्याग करू नये, धैर्य धरावे, सत्कृत्ये करावी, सर्वांच्या हितासाठी त्याग करावा, असा उपदेश या कथांत केलेला आहे.  कधी कधी अशी एखादी गोष्ट केवळ काल्पनिक असते; कधी सत्य व कल्पना यांचे मिश्रण करून परंपरागत आलेल्या एखाद्या गोष्टीचे अतिशयोक्तिपूर्ण चित्र असते.  सत्य व कल्पना यांचे इतके बेमालूम मिश्रण असते की त्यांना पृथक करणे अशक्य असते.  या मिश्रणातून एक काल्पनिक इतिहास तयार होतो.  या इतिहासात प्रत्यक्ष खरोखर काय घडले ते जरी नसले तरी तितकीच महत्त्वाची दुसरी एक गोष्ट यातून निष्पन्न होते.  ती ही की, कथा खरोखरच अशी घडली अशी लोकांची श्रध्दा होती.  आपले शूरवीर पूर्वज असे अचाट पराक्रम करीत असे लोकांना वाटे व लोकांना प्रेरणा देणारी ध्येयेही असत.  अशी लोकांची या कथांसंबंधी वृत्ती असल्यामुळे त्या खर्‍या वा काल्पनिक कथांचा जनतेच्या जीवनावर जिवंत परिणाम चालू राहून सतत असे घडे की रोजच्या काबाडकष्टांतून, दैन्यातून क्षणभर त्यांचे मन या कथांच्या उच्च पातळीवर रमत राही व या कथांमुळे एका अतिदूर, कष्टसाध्य ध्येयाचे निदान दर्शन तरी त्यांना घडून त्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न व शुध्दचरणाच्या मार्गाचे त्यांना दिग्दर्शन घडे.

रोमन लोकांच्या ल्युक्रेशिया वगैरेच्या शौर्य-धैर्याच्या गोष्टी खोट्या आहेत. केवळ तकलुपी आहेत असे म्हणणार्‍यांचा जर्मनी कवी गटे याने धिक्कार केला होता असे सांगतात.  तो म्हणे की जे मुळातच खोटे व नकली- बनावट असते त्याचे सोंग कसेही सजवले तरी बावळट व अवसानघातकीच राहणार; त्यात सौन्दर्य दिसणे शक्य नाही.  त्यातून स्फूर्तीची चेतना होणे शक्य नाही.  अशा सुंदर स्फूर्तिदायक घटनांची कल्पना करण्याइतके तरी रोमन लोकांचे मन मोठे होते, म्हणून आपण निदान त्यावर विश्वास ठेवण्याइतके मन मोठे केले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel