आश्चर्यकारक असे नवीन खोल संशोधन केले.  इंग्लंडमधील रॉयल सोसायटीने अहंकार सोडून त्यांना फेलो केले.  परंतु देशाचे दुर्दैव की, हा हिरा लौकरच पुढे दोन वर्षांनी, वयाच्या ३३ व्या वर्षी- आणि बहुधा क्षयरोगाने- मरण पावला.  मला वाटते की प्राध्यापक ज्युलियन हक्स्ले याने रामानुजम् यांचा या शतकातील सर्वांत थोर गणिती असा कोठेतरी उल्लेख केला आहे.

रामानुजम् यांचे अल्पकालीन जीवन आणि ते मरण म्हणजे भारतीय संसाराचे प्रतीक आहे.  भारतीय स्थितीचे हे निदर्शन आहे.  हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांपैकी किती थोड्यांना आधी शिक्षण मिळते !  आणि कितीतरी अर्धपोटी उपाशी असतात !  ज्यांना थोडेफार शिक्षण मिळते त्यांच्यासमोर कारकुनी मात्र असते, आणि इंग्लंडात बेकारांना भत्ता मिळतो, त्याहूनही त्यांचा पगार कमी असतो.  भारतीयांच्या जीवनाची दारे जर मोकळी झाली, कर्तृत्वाला जर वाव मिळाला, पोटभर खायला आणि नीट राहायला मिळाले, शिक्षणाच्या आणि विकासाच्या सर्व संधी जर मिळाल्या तर भारतीय जनतेतून कितीतरी थोर थोर शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, शिक्षणतज्ज्ञ, यंत्रविशारद, उद्योगपती, लेखक, कलावान पुढे येतील आणि नवभारत आणि नवे जग निर्मायला साहाय्य करतील !

विकास आणि र्‍हास

ख्रिस्त सनाच्या पहिल्या एक हजार वर्षांच्या भारतीय इतिहासात अनेक चढउतार दिसतात; स्वार्‍या करून येणार्‍या विजातीयांशी संघर्ष, त्याचप्रमाणे अंतर्गत विरोधही दिसून येतो.  तरीही एकंदरीत राष्ट्रीय जीवन जोरदार दिसते.  उत्साह उसळत होता, दाही दिशांना भारतीय लोक जात होते, पसरत होते.  संस्कृती वाढून जीवनाच्या अंगोपांगांच्या सुधारणेचा महान वृक्ष झाला होता.  त्याला तत्त्वज्ञान, साहित्य, नाटक, कला, विज्ञान, गणित इत्यादींची रमणीय फळेफुले आली होती.  भारतीय अर्थव्यवस्था वाढत होती; क्षितिज मोठे मोठे होत होते; आणि इतर देश भारताच्या कक्षेत येत होते.  इराण, चीन, ग्रीक दुनिया, मध्य आशिया यांच्याशी संबंध वाढत होते; आणि विशेष म्हणजे पूर्वेकडील समुद्रपार जाण्याची अपार प्रेरणा होऊन हिंदी सीमांपासून अतिदूर अशा आग्नेय आशियात मोठमोठ्या हिंदी वसाहती उभ्या राहिल्या होत्या.  तिकडेही हिंदी संस्कृती पसरली होती.  हा जो हजार वर्षाचा काल, त्यातील मध्याला गुप्त राजवट होती. तिचा ख्रिस्तशकाच्या चौथ्या शतकापासून तो सहाव्या शतकापर्यंतचा काळ सुवर्णकाळ मानला जातो.  गुप्त राजांनी तत्कालीन बौध्दिक आणि कलात्मक चळवळींना उत्तेजन दिले.  ती राजवट त्यांची प्रतीक झाली.  त्या काळातील संस्कृत ग्रंथ म्हणजे वाङ्मयाची भूषणे आहेत, अजरामर अशा त्या वाङ्मयात एक प्रकारची प्रशांत गंभीरता आहे; आत्मविश्वास आहे.  अशा संस्कृतिसुधारणेच्या परमोच्च विकासाच्या काळात आपण जिवंत आहोत याचा एक प्रकारचा सात्त्वि अभिमान त्यात चमकत आहे; स्वत:च्या बौध्दिक व कलात्मक शक्तींचा भरपूर उपयोग करून घ्यायची अंत:प्रेरणा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel