पाश्चिमात्य संस्कृतीचा भारतावरील आघात म्हणजे गतिमान समाजाचा, अर्वाचीन जाणिवेचा, मध्ययुगीन विचारांच्या चाकोरीत फिरणार्‍या गतिहीन समाजावरील आघात होय.  भारतीय विचार आपल्यापरी कितीही प्रगत व प्रगल्भ असले तरी अंतर्गत दोषांमुळे त्यांची आणखी वाढ होणे शक्य नव्हते; ठराविक मर्यादेपलीकडे ते विचार जाऊ शकत नव्हते.  परंतु आश्चर्य असे की, ही ऐतिहासिक घटना ज्यांच्या द्वारा घडत होती त्यांना त्यातील महत्त्व कळलेही नव्हते, इतकेच नव्हे, तर ते ज्या वर्गांपैकी होते तो वर्ग त्यांच्या स्वत:च्या देशात अशा काही प्रवृत्तींचा प्रतिनिधी मुळीच नव्हता.  कारण स्वत:च्या इंग्लंड देशातही युरोपातील नवजागृत विचारांना ते रोधू पाहात होते.  त्यांनी जंगजंग पछाडले परंतु विरोधी शक्ती अतिप्रबळ असल्यामुळे त्यांचे शेवटी काही चालले नाही आणि तो नवप्रवाह पुढे आलाच.  परंतु हिंदुस्थानात त्यांना मोकळे रान होते आणि व्यापक संदर्भात पाहिले तर ज्या फेरबदलाचे व प्रगतीचे ते प्रतिनिधी होते, ते फेरबदल येथे होऊ नयेत, ती प्रगती येथे होऊ नये म्हणून पायबंद घालून ठेवण्यात ते यशस्वी झाले.  हिंदुस्थानातील सामाजिक दृष्ट्या प्रतिगामी अशा वर्गांना त्यांनी उत्तेजन दिले.  त्यांची स्थिती मजबूत करून ठेवली, आणि सामाजिक व राजकीय बदल व्हावा म्हणून ज्यांनी धडपड केली त्यांना त्यांनी विरोध केला.  हिंदुस्थानात बदल झालाच असला तर तो ब्रिटिशांच्या प्रतिगामी कारवायांना न जुमानता झाला आहे, किंवा त्यांच्या दुसर्‍या काही उद्योगांचा अनपेक्षित आणि आनुषंगिक तो परिणाम म्हणा.  परंतु त्या स्थित्यंतराचे श्रेय ब्रिटिशांना नाही एवढे खास.  वाफेचे एंजिन आले, आगगाडी आली, मध्ययुगीन दळणवळणाच्या पध्दतीत हा फारच मोठा बदल होता.  परंतु हा फरक सत्ता दृढ करण्यासाठी होता, देशाची नीट पिळवणूक करता यावी, अंतर्भागाचे स्वत:च्या फायद्यासाठी रक्तशोषण करता यावे म्हणून होता.  हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकार्‍यांचे हेतुपुरस्सर धोरण आणि त्यापासून अनपेक्षीत असे काही झालेले परिणाम यांत विरोध दिसतो आणि त्यामुळे कधीकधी गोंधळ होतो आणि ब्रिटिशांचे खरे धोरणही त्यामुळे प्रच्छन्न राहते.  परकीयांच्या, पाश्चिमात्यांच्या संघर्षामुळे येथे फेरबदल झाले, परंतु हिंदुस्थानातील ब्रिटिशांना न जुमानता ते झाले.  तो जो बदल होत होता त्याची गती मंद करण्यात त्यांना यश आले; ती गती त्यांनी इतकी मंद केली की, आजही पुरे संक्रमण झाले आहे असे नाही.  पुरे संक्रमण अद्याप दूरच आहे.

इंग्लंडातून हिंदुस्थानात सत्ता गाजविण्यासाठी जे सरंजामशाही जमीनदार आणि तत्सम इतर धेंडे येत त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी जमीनदारवर्गाची होती.  हिंदुस्थान म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जणू मालमत्ता, तिची बडी इस्टेट; आणि या इस्टेटीचा आणी तिच्यावरील कुळांचा उत्कृष्ट आणि नैसर्गिक प्रतिनिधी जमीनदाराशिवाय कोण असणार ?  आणि हिंदुस्थानची ही इस्टेट ब्रिटिश राजाच्या हवाली केल्यानंतरही ही दृष्टी पुढे कायमच होती.  (कंपनीला त्या वेळेस भरपूर मोबदला देण्यात आला आणि ती रक्कम हिंदुस्थानच्या डोक्यावर बसवण्यात आली.  हिंदुस्थानच्या विक्रीची किंमतही हिंदुस्थाननेच दिली !  आणि त्या वेळेपासून हिंदुस्थानचे सरकारी कर्ज सुरू झाले) ईस्ट इंडिया कंपनी जाऊन आता हिंदुस्थानचे ब्रिटिश सरकार हेच जमीनदार झाले (किंवा जमीनदाराचे हस्तक म्हणा). आपण म्हणजेच हिंदुस्थान असे व्यवहारात तरी पदोपदी ते दाखवीत.  ज्याप्रमाणे डेव्हनशायर परगण्याचा ड्यूक म्हणजेच सर्व डेव्हनशायर असे दुसरे ड्यूक मानीत तसेच हे.  हिंदुस्थानात राहणारे कोट्यवधी लोक म्हणजे नाना प्रकारचे कर भरणारे, खंड भरणारे, सरंजामशाही व्यवस्थेतील खंड भरणारी कुळे होत, व त्यांचे काम म्हणजे मुकाट्याने खंड भरून आपल्या पायरीने वागत राहावे, हे इतकेच.  अशा या व्यवस्थेविरुध्द तक्रार करणे म्हणजे विश्वाच्या मूलभूत नैतिक कायद्यांविरुध्द गुन्हा, परमेश्वरी इच्छेविरुध्द बंडखोरी असे या मालकांना वाटे.

हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता म्हणजे जणू दैवी घटना ही समजूत आमूलत: अद्यापि बदलली नाही; जरा निराळ्या स्वरूपात ती कल्पना आता मांडण्यात येत असते एवढेच.  पूर्वीची कुळाला छळून खंड वसूल करण्याची उघडउघड वृत्ती जाऊन आता आता जरा वक्रमार्गांनी, थोड्याफार गोड शब्दांनी परंतु प्रकार तोच चालला आहे.  आता कबूल करतात की, या आमच्या सरकारने, या मालकाने जरा उदार होऊन कुळांना जरा नीट वागविले पाहिजे, त्यांचे कल्याण पाहिले पाहिजे; जी कुळे अधिक निष्ठावंत व प्रामाणिक असतील त्यांचा दर्जा थोडा वाढविला पाहिजे.  जमीनदारी व्यवस्थेतील दुय्यम जागेवर त्यांना नेमले पाहिजे, कारभारातील थोडा बारीकसारीक हिस्सा त्यांना दिला पाहिजे.  परंतु या जमीनदारी पध्दतीला कोणी आव्हान देईल तर ते मात्र सहन केले जाणार नाही.  मालकांची अदलाबदल झाली तरी मिळकतीची व्यवस्था पूर्ववतच चालली पाहिजे.  ज्या वेळेस परिस्थितीच्या व घटनांच्या दडपणामुळे ईस्ट इंडिया कंपनीला मालकी सोडावी लागली आणि ती ब्रिटिश सरकारकडे आली त्या वेळेस असा करार करण्यात आला की, या मिळकतीच्या कचेरीतील सर्व प्रामाणिक कारभार्‍यांना पुढे चालू ठेवावे, जमीनदाराच्या सर्व नवीन जुन्या दोस्तांची व अनुयायी आणि आश्रितांची सोय केली जावी, जुन्या वर्षासनवाल्यांची वर्षासने चालू राहावी, जुन्या जमीनदाराने, मालकाने अत:पर इस्टेटीसंबंधी सल्लागार म्हणून राहावे.  उदार आशीर्वाददाता या नात्याने वागावे.  अशा रीतीने महत्त्वाचे फेरबदल होऊ नयेत म्हणून व्यवस्था करून ठेवण्यात आली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel