स्मृतीचा, कर्माचा, असा हा जो गतकालाचा वारसा चालू पिढीकडे येतो त्याचा परिणाम व्यक्तीपेक्षाही समष्टिरूपाने राष्ट्र म्हणून असलेल्या मानवसमूहावर अधिक होत असावा, कारण एक निराळी व्यक्ती व अशा अनेक निरनिराळ्या व्यक्ती मिळून जमलेला जमाव यांच्या मन:स्थितीची तुलना करून पाहिली तर असे आढळते की, आपल्याला काय करावयाचे आहे याची जाणीव न होता नकळत, व वैयक्तिक भेदभाव न राहता व्यक्तिनिरपेक्ष, अशी कृत्ये करण्याची ओढ व्यक्तीपेक्षा जमावाला अधिक असते, आणि जमाव जे काही करायला निघाला असेल तिकडून दुसरीकडे जमावाला वळवणे अधिक कठीण जाते. एखाद्या मानवसमूहाचे मन वळवायचे झाले तर कपटी अपप्रचार हा, विशेषत: आधुनिक जगात अधिक सोपा उपाय आहे.  क्वचितच का होईना, पण एखादेवेळी असेही आढळते की, व्यक्तीच्या आवतीभोवतीच्या समूहाचा आचार अधिक श्रेष्ठ प्रकारचा असल्यामुळे त्या व्यक्तीला आपले स्वार्थी वर्तन व संकुचित दृष्टी सोडणे भाग होते.  परंतु बहुधा असे आढळते की, व्यक्तीच्या वैयक्तिक नैतिक पातळीपेक्षा त्याच्या समूहाची सामूहिक नैतिक पातळी फारच खाली असते.

युध्द सुरू झाले तर लोकांत या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होताना आढळतात, पण विशेषत: आपल्यावर आता काही नैतिक उत्तरदायित्व उरलेले नाही अशी भावना लोकांत प्रबळ होते, आणि समाज हळूहळू सुसंस्कृत होत जाताना इतक्या प्रयासाने समाजात मान्यता पावलेली मूल्ये पार ढासळून पडतात.  त्या युध्दात व आक्रमणात जय झाला म्हणजे जेत्यांची ही मन:प्रवृत्ती पुढेही तशीच राहते, मग त्यांना साम्राज्यसत्तेची अभिलाषा येते, आणि आपला मानववंश म्हणजे काही अलौकिक आहे, स्वामिवंश आहे अशा कल्पना जेत्या लोकांना येऊ लागतात.  जे हरतात त्यांच्या पदरी निराशा आल्यामुळे ते उव्दिग्न होऊन बसतात, सूड कसा घ्यावा त्याचे विचार त्यांच्या मनात घोळत राहतात.  जित काय किंवा जेते काय, दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल द्वेष, व हिंसाप्रवृत्ती वाढतच जाते. कोणी कोणाची दयामाया ठेवीत नाही, पशुतुल्य अत्याचार होतात, विरूध्द पक्षाचे म्हणणे तरी काय आहे ते ऐकून घ्यायला सुध्दा कोणी तयार नसतो.  अशा या परिस्थितीवर पोसल्या जाणार्‍या त्या उभयतांच्या भवितव्याच्या अंगी तेच गुण उतरतात, आणि पुन्हा भांडणे, युध्दे व त्यांच्या मागोमाग येणारे सारे प्रकार, असे चक्र फिरत राहते.

इंग्लंड व हिंदुस्थान यांचा गेली दोनशे वर्षे जो सक्तीचा संबंध जडला त्यामुळे उभयतांचेही हे कर्म उभे राहिले आहे, हा प्रारब्धयोग आला आहे, आणि त्यांच्या परस्परासंबंधात तोच अद्यापही प्रभावी ठरतो आहे.  ह्या कर्मपाशात गुंतून अडकून पडलेले असतानाही आमच्याकडून आम्ही ह्या झाल्या गेल्या गोष्टींचा वारसा सोडून देण्याची खूप खटपट करून पाहिली पण ते सारे व्यर्थ गेले.  ह्या महायुध्दाच्या गेल्या पाच वर्षात त्या कर्मात दुर्दैवाने भरच पडत गेली आहे, आणि परस्परप्रेमाचा यथायोग्य संबंध असे रूप या दोन देशांमधील संबंधाला येणे अधिक कठीण होऊन बसले आहे.  जगातल्या सार्‍या गोष्टी असतात तसाच ह्या दोनशे वर्षांचा इतिहासही काही बरे तर काही वाईट असे दोन्ही प्रकार मिळून झालेला आहे.  इंग्रजांच्या दृष्टीला त्यातला कल्याणकारक भागच अधिक आहे असे दिसते, तर हिंदी माणसाला त्यात वाईट इतके काही दिसते की त्याच्या दृष्टीला तो सबंध काल वाईटानेच भरलेला काळाकुट्ट दिसतो.  पण या बर्‍यावाइटाचे प्रमाण काहीही असले तरी इतर मात्र निश्चित उघड दिसते की, कोणत्याही संबंधात सक्ती आली की परस्पराविषयी द्वेष व कटुता आलीच, आणि अशा या भावनांतून केवळ वाईट परिणामच निघावयाचे.

हिंदुस्थानच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीत क्रांतिकारक स्वरूपाचे स्थित्यंतर होणे अवश्य आहे, इतकेच नव्हे तर ते आता कोणी टाळू म्हटले तरी टळत नाही.  इंग्लंड व हिंदुस्थान या दोन्ही देशांच्या संमत्तीने अशा प्रकारचे स्थित्यंतर होण्याची शक्यता, निदान थोडीफार आशा, सन १९३९ मध्ये युध्द सुरू झाल्यानंतर त्या वर्षाच्या अखेरीस व नंतर पुन्हा सन १९४२ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास वाटत होती.  परंतु ती शक्यता, ती संधी, आली तशील गेली, कारण परिस्थितीत मूलगामी स्थित्यंतरे करायला भय वाटत होते.  पण काहीही झाले तरी स्थित्यंतर हे होणारच मग ते उभयपक्षांच्या संमतीने होण्याची वेळ पार टळून गेली आहे काय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel