चंद्रगुप्त आणि चाणक्य : मौर्य साम्राज्याची स्थापना

हळूहळू बौध्द धर्म हिंदुस्थानात पसरला.  आरंभी जी ही चळवळ क्षत्रियांची असली व धर्मोपदेशक वर्ग व राज्य करणारा वर्ग यांच्या भांडणाचा एक प्रकार असला तरी तिच्यातील नैतिक आणि लोकशाही प्रवृत्तींचा सर्व जनतेवर परिणाम झाला.  विशेषत: उपाध्येगिरी आणि नाना प्रकारचे कर्मकाण्ड यांच्यावरील बौध्द धर्माचा हल्ला बहुजनसमाजाला आवडला.  या चळवळीला जनतेच्या उध्दराच्या चळवळीचे स्वरुप आले व त्यामुळे कांही विचारवंत ब्राह्मणही या चळवळीत आले.  परंतु सर्वसाधारणपणे ब्राह्मणांचा या चळवळीला विरोध होता; आणि ते बौध्द धर्मीयांना नास्तिक, प्रस्थापित वेदधर्माविरुध्द बंड करणारे पाखंडी असे म्हणत.  बौध्द धर्माच्या बाह्य प्रसारापेक्षा जुन्या धर्मावर त्यांचा व त्याच्यावर जुन्या धर्माचा उलटसुलट, जो परिणाम होत होता तो अधिक महत्त्वाचा होता व ब्राह्मणांचे महत्त्व त्यामुळे सारखे कमी होत होते.  बुध्दानंतर अडीचशे वर्षांनी झालेल्या सम्राट अशोकाने स्वत: बौध्द धर्माची दिक्षा घेतली व हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानच्या बाहेरील देशांतही शांततेच्या मार्गांनी बौध्दधर्माचा प्रसार करण्याकडे त्याने आपली सर्व शक्ती लावली.

या दोन शतकांत हिंदुस्थानात महत्त्वाची घडामोड झाली.  निरनिराळ्या वंशसमूहांचे एकीकरण करण्यासाठी, त्याचप्रमाणे लहान लहान राज्ये व प्रजामंडळे यांचेही एकत्रीकरण व्हावे म्हणून नाना प्रकारच्या चळवळी फार पूर्वीपासून सुरु होत्या.  एक संयुक्त मध्यवर्ती सत्तेचे शासनतंत्र निर्माण करण्याचे जे प्राचीन ध्येय त्यातूनच एक अत्यंत सुव्यवस्थित, बलिष्ठ साम्राज्य उदयाला आले.  या चळवळीला अलेक्झांडरच्या स्वारीमुळे भरतीची शीग लागली व बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन तिला आपल्या इच्छेनुरुप वळण देण्याची शक्ती असलेले दोन प्रभावी पुरुष पुढे सरसावले.  चन्द्रगुप्त मौर्य आणि त्याचा मित्र, मंत्री व गुरु तो ब्राह्मण चाणक्य हे ते दोन पुरुष होत.  या दोघांची युती परस्परपूरक अशी झाली.  मगध देशात त्या वेळेस नंदाचे राज्य होते, त्याची पाटलिपुत्र (हल्लीचे पाटणा) ही राजधानी होती.  चन्द्रगुप्त आणि चाणक्य या दोघांनाही मगध राज्यातून हद्दपार करण्यात आले होते.  दोघेही वायव्येकडे तक्षशिला येथे गेले व अलेक्झांडरने तेथे जे ग्रीक सैन्य ठेवले होते, त्यांच्याशी त्यांचा संबंध आला.  चंद्रगुप्त स्वत: अलेक्झांडरला भेटला होता.  अलेक्झांडरच्या पराक्रमाच्या, दिग्विजयाच्या रोमहर्षक कथा त्याने ऐकल्या होत्या, आणि आपणही असे काही करावे अशा महत्त्वाकांक्षेने त्याला स्फुरण आले.  चंद्रगुप्त व चाणक्य दोघे मिळून परिस्थितीवर लक्ष ठेवून तयारी करीत होते, मोठमोठ्या महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखून ठेवल्या होत्या; त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य संधीची ते वाटत पाहात बसले.

लौकरच ख्रिस्त पूर्व ३२३ मध्ये बाबिलोन येथे अलेक्झांडर मेल्याची वार्ता आली.  चन्द्रगुप्त व चाणक्य दोघांनी राष्ट्राभिमानाची जुनी परंतु सदा नवी स्फूर्ती देणारी हाक राष्ट्राला दिली व परकी आक्रमकांविरुध्द उठाव करण्यासाठी त्यांनी जनतेला चेतविले.  संरक्षणाकरता ठेवलेल्या ग्रीक शिंबदीला हाकून देऊन तक्षशिलेचा कबजा घेण्यात आला.  राष्ट्रकरता म्हणून केलेल्या विनंतीमुळे चन्द्रगुप्ताला अनेक मित्रांचे साहाय्य मिळाले.  त्या सर्वांच्या मदतीने उत्तर हिंदुस्थान ताब्यात घेत तो थेट पाटलिपुत्रावर स्वारी करुन आला.  अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर दोन वर्षांच्या आतच चंद्रगुप्ताने पाटलिपुत्र सर केले व मगध देशाचा तो स्वामी होऊन मौर्य साम्राज्याची स्थापना झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel