गुजराथ, काठेवाड, कच्छ येथील लोक पुरातन कालापासून व्यापारी, कारखानदार, दुकानदार होतेच व त्यांना समुद्रप्रवासाचा सरावही होता.  हिंदुस्थानात अनेक फेरबदल होत होते.  परंतु नवीन परिस्थितीशी जुळते घेऊन या लोकांनी आपला धंदा सुरूच ठेवला.  व्यापार व उद्योगधंदे यांत आज तेच अग्रणी आहेत. त्यांचा धर्म कोणताही असला किंवा त्यातल्या काही लोकांचे धर्मांतर झाले असले तरी त्यांच्या या वृत्तीत काहीही फरक पडलेला नाही. तेराशे वर्षांपूर्वी गुजराथमध्ये येऊन वस्ती करून राहिलेले पारशी ह्या दृष्टीने गुजराथी म्हणूनच समजावयाला हरकत नाही. (त्यांची भाषाही गुजराथीच आहे).  मुसलमानांतसुध्दा कारखानदारी व व्यापार यात अगदी प्रमुख, नाणावलेल्या जमाती म्हणजे खोजा, बोहरी, मेमन हे लोकच आहेत.  हिंदुस्थानातूनच धर्मांतर केलेले हे लोक मूळचे काठेवाड, कच्छ, गुजराथमधलेच.  नुसता हिंदुस्थानातील व्यापारच या गुजराथ्यांच्या हाती आहे असे नाही, ते ब्रह्मदेश, सिलोन, पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका आणि अशाच इतर परदेशांतही पसरले आहेत.

रजपुतान्यातील मारवाडी मंडळीच्या हातात अंतर्गत व्यापार व त्यात गुंतवलेले भांडवल व देवघेव असून देशातील पेठांतून ते सर्वत्र आढळतात.  मोठमोठ्या रकमांच्या उलाढालीपासून ते तहत लहानसहान खेड्यातील पेढी दुकानापर्यंत सर्वत्र त्यांची भरती होती.  एखाद्या नामांकित मारवाडी पेढीवरील हुंडी हिंदुस्थानात कोठेही व हिंदुस्थानाबाहेरही पटविली जाई.  आजही मारवाडीच बड्या भांडवलाचे मालक आहेत.  शिवाय त्यांनी त्याला कारखानदारीही आता जोडली आहे.

वायव्येकडील सिंधी लोकांचीही पुरातन व्यापारी परंपरा आहे. शिकारपूर किंवा हैदराबाद येथे त्यांचे मुख्य केंद्र असे.  तेथून आणि पश्चिम आशियाभर व तसेच इतर देशांतही ते जात.  आज (युध्दाच्या आधी) जगात असे एकही बंदर नाही की जेथे एखाददुसरे तरी सिंधी दुकान नाही.  काही पंजाबी लोकांचाही परंपरागत व्यापारी धंदा आहे.

मद्रासकडचे चेट्टीही प्राचीन काळापासून व्यापारधंद्यात असेच प्रमुख असून त्यांच्याही मोठ्या पेढ्या होत्या.  चेट्टी शब्द संस्कृत श्रेष्ठीपासून आला आहे.  श्रेष्ठी म्हणजे व्यापारीधंद्याचा अध्यक्ष.  शेठ हा सर्वसाधारण शब्दही श्रेष्ठीपासूनच आलेला आहे.  दक्षिण हिंदुस्थानात सर्वत्र चेट्टींचेच प्राबल्य आहे, एवढेच नव्हे तर ब्रह्मदेशातही त्यांचा फार मोठा पसारा आहे. तिकडे खेड्यापाड्यांतूनही ते पसरले आहेत.

त्या त्या प्रांतातील उद्योगधंदा, देवघेव, वंशपरंपरा शतकानुशतके जो वैश्य वर्ग करीत आला, त्यांच्याच हातात राहिला. ते घाऊक व किरकोळ दोन्ही प्रकारचा व्यापार चालवीत व सावकारीही करीत.  प्रत्येक खेड्यात वाण्याचे दुकान असायचेच. त्यात खेड्यातून रोज लागणारे जिन्नस मिळत व खेड्यातील लोकांना चांगल्या भारी दराने कर्जाऊ रकमाही मिळत.  खेड्यापाड्यातून उधारीचा व किरकोळ कर्जाऊ रकमांचा धंदा संपूर्णपणे या लोकांच्याच हाती असे. ते वायव्येकडील प्रांतात पठाण जातिजमातींतही जाऊन राहिले आणि तेथेही त्यांचा पुष्कळ महत्त्वाचा उपयोग होई.  जसजसे दारिद्र्य वाढू लागले तसे शेतकर्‍यांचे कर्ज झपाट्याने वाढू लागले व गहाणाचा धंदा सुरू होऊन शेवटी पुष्कळशी शेती या सावकारी पेढ्यांच्या मालकीची झाली.  अशा तर्‍हेने सावकार जमिनीचेही मालक होऊन बसले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel