*  कोलंबसाने अमेरिकेचा लावलेला शोध अकबराने ऐकला होता असे अबुल फझल लिहितो.  जहांगीरच्या पुढील कारकीर्दीत युरोपद्वारा अमेरिकेचा तंबाखू हिंदुस्थानात आला.  जहांगीरने तंबाखूचा प्रसार दडपून टाकण्याची शर्थ केली, परंतु झपाट्याने, आश्चर्यकारक रीतीने तंबाखू दूरवर गेला.  सबंध मोगल कालखंडात हिंदुस्थानचे मध्यआशियाशी निकट संबंध होते.  रशियापर्यंत हे संबंध गेले होते आणि राजकीय व व्यापारी शिष्टमंडळाचे रशियन बखरीतून उल्लेख आहेत.  एका रशियन मित्राने या उल्लेखाकडे माझे लक्ष वेधले होते.  इ.स. १५३२ मध्ये खोजा हुसेन नावाचा बाबराचा वकील मैत्रीचा तह करण्याकरता मॉस्कोला गेला होता.  मायकेल फेडोरोविच या झारच्या कारकीर्दीत (१६१३-१६४५) हिंदी व्यापार्‍यांनी व्होल्गा नदीच्या तीरावर वसाहत केली होती.  १६२५ मध्ये आस्ट्राखान येथे लष्करी गव्हर्नराच्या हुकुमानुसार एक सराई बंगली बांधण्यात आली होती.  हिंदी कारागिरांना विशेषत: विणकरांना मॉस्कोहून आमंत्रण आले होते.  इ.स. १५९५ मध्ये सेमीन मेलेन्की हा रशियन व्यापारी दलाल हिंदुस्थानात आला होता.  औरंगजेबाने त्याची भेट घेतली होती.  १७७२ मध्ये पीटर-दी-ग्रेट याने आस्ट्राखान शहराला भेट देऊन हिंदी व्यापार्‍यांना मुलाखत दिली.  इ.स. १७४३ मध्ये काही हिंदी साधू आस्ट्राखान येथे आले.  त्यांच्यापैकी दोघे कायमचे रशियात राहिले.  ते रशियन रहिवासी झाले.
----------------------------

एकरूप संस्कृतीचा विकास

अकबराने इतका भक्कम पाया घातला होता की, त्याच्या पाठीमागून गादीवर येणारे जरी तितकेसे लायक नसले तरीही साम्राज्याची इमारत शंभर वर्षे टिकून राहिली.  प्रत्येक बादशहाच्या मरणानंतर गादीसाठी राजपुत्रांत लढाया होत आणि त्यामुळे मध्यवर्ती सत्ता दुबळी होई.  परंतु दरबारचा इतमाम आणि डौल पूर्वीचाच असे, आणि भव्य मोगल

बादशहांची कीर्ती आशिया युरोपभर पसरली.  आग्रा आणि दिल्ली शहरांत नवीन भव्य इमारती उभ्या राहिल्या.  त्यांत वास्तुशास्त्रातील प्राचीन भारतीय ध्येये आणि रेखांची उदात्तता आणि नवीन साधेपणा यांचे मनोहर मिश्रण प्रतीत होई.  उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानातील मंदिरे आणि इतर इमारती यांच्यात निर्जीव, अती अलंकृत, फार विस्तार दाखविलेली अशी जी कला दिसते तिच्याहून ही नवीन हिंदी-मोगल कला स्पष्टपणे वेगळी उमटून पडते, आणि स्फूर्तीने भारून गेलेल्या वास्तुतज्ज्ञांनी रूपरेषांची योजना आखून आग्रा येथे हळुवार हातांनी ताजमहाल बांधला आहे.

शेवटचा मोठा मोगल म्हणजे औरंबजेब.  त्याने या संस्कृतिविकासाच्या घड्याळाचे काटे मागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात ते घड्याळच त्याने बंद पाडले आणि शेवटी फोडून त्याचे तुकडे तुकडे केले.  हिंदी राष्ट्राच्या वृत्तिप्रवृत्तींशी एकरूप होऊन जोपर्यंत मोगल सम्राट एकरूप राष्ट्रीयतेसाठी आणि देशातील विविध अंगांचा समन्वय करण्यासाठी म्हणून प्रयत्न करीत होते, तोपर्यंत ते बलशाली होते.  औरंगजेब या चळवळीला जेव्हा विरोध करू लागला, ती दडपू लागला आणि हिंदी राज्यकर्ता म्हणून वागायच्याऐवजी एक मुस्लिम बादशहा म्हणून वागू लागला तेव्हा हे साम्राज्य मोडू लागले.  अकबराने आणि त्याच्यामागून येणार्‍यांनीही थोडे फार केलेले कार्य औरंगजेबाने नाहीसे केले.  अकबराच्या धोरणामुळे ज्या विविध शक्ती दबून राहिल्या होत्या, नियंत्रित-संयत राहिल्या होत्या, त्या आता मोकाट सुटल्या आणि या मुक्त शक्तींनी मोगल साम्राज्याला आव्हान दिले.  नवीन चळवळी उदयाला आल्या, त्या संकुचित असल्या तरी पुन्हा उसळलेल्या राष्ट्रीयतेच्या त्या प्रतिनिधीभूत होत्या.  या नव्या चळवळींना शाश्वत, टिकाऊ असे जरी काही उभारता आले नाही, आणि परिस्थितीही त्यांच्या विरुध्द होती, तरी मोगल साम्राज्याचा धुव्वा उडविण्याइतक्या त्या प्रबळ होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel