कठोर यतिधर्माची नैतिक थोरवी तितकीशी नाही असे बुध्दांचे म्हणजे असे, परंतु त्यांच्या शिकवणीचा दुर्दैवेकरून जीवनाकडे निराशेने व दु:खाने पाहण्यात परिणाम झाला.  हीनयान पंथात विशेषेकरून ही दृष्टी आहे.  जैनधर्मात त्याहूनही अधिक आहे.  पारलौकिकतेवर अधिक भर देण्यात येऊ लागला.  जगातील जंजाळापासून मुक्त होण्याची इच्छा बलवत्तर झाली. ब्रह्मचर्यावर अधिक भर देण्यात आला.  मांसाशनाचा त्याग वाढला.  बुध्दांच्या पूर्वीही हे विचार नव्हते असे नाही, परंतु त्या वेळेस निराळ्या गोष्टींवर भर होता.  जुन्या आर्यधर्मातील ध्येय म्हणजे संपूर्ण, सर्वांगीण जीवन हे होते व त्यावर भर दिलेला होता.  ब्रह्मचर्याश्रमात ब्रह्मचर्य आणि यतिजीवन ठेवावे, गृहस्थाने सर्व सांसारिक गोष्टींत रमून भाग घ्यावा. नंतर हळूहळू पुन्हा संसारातून निवृत्त होऊन व्यक्तिगत विकास आणि सामाजिक सेवा यांना वाहून घ्यावे आणि अखेरीस वार्धक्यात संन्यास घेऊन जीवनाच्या सर्वसाधारण वृत्तिप्रवृत्तीपासून सर्व प्रकारच्या आसक्तीतून संपूर्णपणे निवृत्त व्हावे, हा आदर्श होता.

पूर्वी यतिवृत्तीचे लोक तपोवनातून राहात व यांच्याभोवती छात्र गोळा होत.  परंतु बौध्दधर्माच्या उदयानंतर प्रचंड विहार ठायीठायी उभे राहिले व भिक्षू आणि भिक्षूणी त्यातून राहू लागून, लोकांचे थवेच्याथवे त्यांच्याकडे जाऊ लागले.  बिहार प्रांताचे नावच मुळी 'विहार' या शब्दावरून आले आहे.  यावरून सार्‍या बिहारभर त्या वेळेस या मठांचे जाळे केवढे परसलेले असावे ते दिसते.  या विहारांतून शिक्षणही देण्यात येत असे किंवा कधी कधी त्याचा पाठशालांशी, विद्यापीठाशीही संबंध जोडीत.

हिंदुस्थानातच केवळ नव्हेत, तर सर्व मध्ये आशियाभर प्रचंड बुध्दविहार अनेक होते.  बल्ख येथे एक सुप्रसिध्द विहार होता त्यात एक हजार बौध्दभिक्षू राहात.  या विहाराची पुष्कळशी माहिती उपलब्ध आले.  या विहाराला 'नव-विहार' असे नाव होते, त्याचा पर्शियन भाषेत नौबहार असा पुढे अपभ्रंश झाला.

चीन, जपान, ब्रह्मदेश इत्यादी देशांत बौध्दधर्म कितीतरी वर्षांपासून आहे.  परंतु हिंदुस्थानातच त्याचे स्वरूप अधिक पारलौकिक दृष्टीचे असे का बरे झाले ?  मला सांगता येत नाही. परंतु मला वाटते की त्या त्या देशातील पार्श्वभूमी, धर्माला स्वत:ला अनुकूल असे स्वरूप देण्याइतकी समर्थ प्रभावी ठरली.  उदाहरणार्थ, चीनमध्ये लाओत्सी आणि कन्फ्यूशियस यांची प्रबळ परंपरा होती व दुसरेही तत्त्वज्ञानी होऊन गेले होते.  तसेच चीन व जपान यांनी हीनयान पंथापेक्षा कमी निराशावादी असा महायान पंथ स्वीकारला होता.  हिंदुस्थानवर बौध्दधर्माखेरीज आणखी जैनधर्माचाही परिणाम झाला होता.  जैन तत्त्वज्ञान व जैनधर्ममते सर्वांहून अधिक पारलौकिक वृत्तीची आणि संसारत्यागी अशी होती.

बौध्दधर्माचा हिंदुस्थानवर आणखी एक विचित्र परिणाम झालेला आहे आणि तो सामाजिक रचनेच्या बाबतीत होय.  चातुरर्वर्ण्य किंवा जातिभेद यांना बौध्दधर्माची वृत्ती विरोधी होती.  परंतु त्यातील मूलभूत कल्पना बौध्दधर्माने स्वीकारली.

बुध्दाच्या काळी चातुरवर्ण्याला, जातींना जरा लवचिकपणा होता.  तितकी कडकबंदी नव्हती.  जन्मापेक्षा कर्माला, पात्रतेला, चारित्र्याला अधिक प्राधान्य दिले जाई.  बुध्दांनीही समर्थ, व्रती, आणि उत्कट तळमळ असणार्‍याला ब्राह्मण ही संज्ञा लाविली आहे.  वर्णाकडे किंवा स्त्रीपुरुष संबंधाकडे त्या काळी कोणत्या दृष्टीने बघत हे छांदोग्य उपनिषदातील सत्यकामाच्या कथेवरून दिसून येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel