हिंदुस्थानात आल्यावर यित्सिंग नालंदा येथे बरेच दिवस अभ्यास करीत राहिला.  चीनमध्ये परत जाताना त्याने शेकडो हस्तलिखित ग्रंथ बरोबर नेले.  बौध्दधर्मातील नानाविधी, महोत्सव यांची त्याला जिज्ञासा होती.  त्यासंबंधीची भरपूर माहिती त्याने दिली आहे.  शिवाय हिंदी लोकांच्या चालीरीती, खाणेपिणे, वस्त्रे-आभूषणे यांच्यावरही त्याने लिहिले आहे.  उत्तर हिंदुस्थानात आजच्याप्रमाणेच गहू मुख्य अन्न होते, आणि दक्षिणेकडे व पूर्वेकडे तांदूळ खात.  मांसाशन होते, परंतु कधीकधीच ते दिसे.  (यित्सिंग दुसर्‍या लोकांपेक्षा बौध्द भिक्षूंचेच वर्णन करीत असावा.)  तूप, तेल, दूध, मलई इत्यादी पदार्थ सर्वत्र भरपूर दिसत; भरपूर फळे होती.  नाना प्रकारच्या लाडू-वड्या खूप करीत.  शुचिर्भूतपणाला एखाद्या धार्मिक विधीइतके महत्त्व भारतात दिले जाते, ही गोष्ट यित्सिंगने मुद्दाम लिहिली आहे.  तो म्हणतो, ''आर्य देश (पंचप्रदेशांचा हिंदुस्थान) आणि इतर देश यांच्यातील सर्वांत मुख्य फरक कोणता असेल तर तो पवित्र-अपवित्र, शुध्द-अशुध्द, चांगले व खरकटे हा भेद पाळणे.  चीनमध्ये जसे एका जेवणातून उरलेले अन्न पुढे केव्हातरी खाण्याकरता जतन करून ठेवतात तसे आर्यदेशात मुळीच चालत नाही, ते त्यांच्या नियमाप्रमाणे निषिध्द, खरकटे मानले आहे.''

यित्सिंग हिंदुस्थानचा (सि-फँग) पश्चिमेकडील देश असा सामान्यत: उल्लेख करतो.  परंतु या देशाला 'आर्य-देश' असे म्हणतात असे तो सांगतो.  ''या पश्चिम देशाला आर्य देश असे नाव आहे; आर्य म्हणजे थोर, देश म्हणजे भूमीचा विस्तार.  या पश्चिम देशाला असे नाव पडण्याचे कारण थोर लोक पुन:पुन्हा या भूमीत जन्माला येतात, त्यामुळे या नावाने या देशाची महती वर्णन करण्यात येते.  या देशाला मध्यदेश अशीही संज्ञा आहे, कारण शेकडो, असंख्य देशांचे हा देश म्हणजे केंद्र आहे.  हे नावही सर्वांच्या परिचयाचे आहे.  उत्तरेकडील जमातीच (हूण किंवा मोगल किंवा तुर्क) या थोर देशाला, आर्य देशाला हिंदू (हिं-तु) असे म्हणतात.  परंतु हे नाव सर्वसामान्य नाही.  ते एका भाषेपुरते नाव आहे, त्याला विशेष अर्थ नाही.  भारतातील लोकांना हे नाव माहीतही नाही, भारताला अत्यंत योग्य असे नाव 'आर्यदेश' हेच आहे.''

'हिंदु' या नावाचा यित्सिंगने केलेला उल्लेख मौजेचा आहे.  तो पुढे म्हणतो, ''कोणी म्हणतात इन्दु म्हणजे चंद्र; आणि चिनी लोकांनी भारताला यिन्तु (इन्दु) हे नाव जे दिले ते इन्दूवरूनच दिले असावे.  परंतु हे नाव काही सर्वसामान्य असे नाही.  तसेच भारतीयांनी थोर अशा चौ देशाला चीन नाव दिले आहे.  परंतु ते एक साधे नाव झाले.  त्याने विशेष अर्थबोध होत नाही.''  कोरिया आणि अन्य देशांना असलेली संस्कृत नावे यित्सिंगने दिली आहेत.

हिंदुस्थान आणि अनेक हिंदी गोष्टी गित्सिंगला जरी स्तुतिपात्र वाटत असल्या तरी त्याच्या हृदयात पहिले स्थान त्याच्या मातृभूमीलाच होते, हे त्याने स्पष्ट दर्शविले आहे.  हिंदुस्थान 'आर्यदेश' असेल तर चीन 'दिव्यभूमी' आहे.  ''आपण पवित्र व विशुध्द आहोत, उत्तम आहोत असा पंचप्रदेशाचे, आर्यदेशाचे लोक अभिमान बाळगतात.  परंतु उत्तम शिष्टाचार, प्रौढ वाङ्मय, समयोचित वागणूक, नेमस्ती वृत्ती व स्वागत करण्याची व निरोप देण्या-घेण्याची रीतभात, अन्नाची मधुर रुची, परोपकार-बुध्दी व सत्प्रवृत्ती यांची विपुलता इत्यादी गोष्टी चीनमध्येच फक्त आढळतील.  या बाबतीत कोणीही चीनहून श्रेष्ठ नाही.''  यित्सिंग आणखी लिहितो, ''वेदना थांबविण्याकरता सुईने क्षते पाडणे व डाग देणे या वैद्यकीय क्षेत्रात, नाडीपरीक्षेच्या कामात चीनमधील वैद्यांहून अधिक निष्णात असे आर्यदेशात कोणी आढळले नाही; तसेच आयुष्यवर्धनाची, दीर्घजीवनाची औषधे फक्त चीनमध्येच आहेत.  चीनमधील लोकांचे चारित्र्य आणि चीनमध्ये असणार्‍या वस्तूंमधील गुण पाहूनच नीचला 'देवाची भूमी, दिव्यभूमी' असे नाव देण्यात आलेले आहे.  हिंदुस्थानच्या पाचही भागात असा कोण  आहे की जो चीनची स्तुती करीत नाही ?''

जुन्या संस्कृतात चिनी सम्राटाला 'देवपुत्र' ही संज्ञा दिलेली आहे.  'स्वर्गाचा पुत्र' याचे ते बरोबर संस्कृत भाषांतर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel