भारतीय उद्योगधंद्यांचा नाश आणि शेतीलाही आलेली अवकळा

ईस्ट इंडिया कंपनीचा आरंभीचा मूळ हेतू हिंदी तयार माल युरोपात नेणे हा होता.  हिंदी कापड तसेच पूर्वेकडील मसाल्याचे पदार्थ वगैरेंना युरोपात मोठी मागणी असे, आणि म्हणून तर ही कंपनी स्थापन झाली.  परंतु इंग्लंडात उद्योगधंद्यातील नवीन तंत्र अंमलात आल्यापासून कंपनीच्या या धोरणात फरक झाला पाहिजे अशी मागणी करणारा एक नवीन औद्योगिक भांडवलदारांचा वर्ग अस्तित्वात आला.  त्याचे म्हणणे हिंदी मालाला ब्रिटिश बाजारात बंदी करावी आणि ब्रिटिश मालाला हिंदी बाजारपेठ मोकळी करावी.  या नवीन वर्गाचे पार्लमेंटवर वजन होते आणि पार्लमेंटही कंपनीच्या उद्योगाकडे आणि हिंदुस्थानाकडे अधिक लक्ष देऊ लागले.  या धोरणाची सुरुवात म्हणून कायदे करून हिंदी मालाला ब्रिटनमध्ये मज्जाव करण्यात आला व हिंदी मालाची निर्यात करण्याची मक्तेदारी कंपनीकडे असल्यामुळे इतर देशांतील बाजारावर या गोष्टींचा परिणाम झाला.  यानंतर लगेच अनेक रीतींनी हिंदी उद्योगधंदे छाटून टाकण्याची व चिरडून टाकण्याची जोरदार चळवळ सुरू होऊन हिंदुस्थानच्या अंतर्गत भागात मात्र जकाती व कारवाया सुरू करण्यात आल्या.  त्यामुळे देशातल्या देशातही माल इकडून तिकडे जाण्यास प्रतिबंध होऊ लागला.  परंतु ब्रिटिश मालाला मात्र सर्वत्र मुक्तद्वार होते.  हिंदी कापडाचा धंदा साफ बसला व लाखो विणकर आणि इतर कारागीर बेकार झाले.  बंगाल व बिहारमध्ये तर विनाश झपाट्यानेच सुरू झाला व इतरत्र जसजशी ब्रिटिश सत्ता आणि रेल्वे रस्ता पसरू लागला तसतशी हीच अवकळा येऊ लागली.  सबंध एकोणिसाव्या शतकभर हा विनाश सुरू होता.  त्यापायी दुसरेही इतर अनेक धंदे—गलबते बांधण्याचा, काचकामाचा, कागद तयार करण्याचा, धातुकामाचा— असे कैक धंदे उद्ध्वस्त झाले.

उद्योगधंद्यांतील जुन्या उत्पादनपध्दतीचा नवीन पध्दतींशी संघर्ष आल्यामुळे काही अंशी हे असे घडणे अपरिहार्यच होते.  परंतु राजकीय आणि आर्थिक दडपणामुळे आणि नवीन तंत्र वापरण्याचा हिंदुस्थानात प्रयत्न न केल्यामुळे हा र्‍हास अधिकच झपाट्याने झाला.  इतकेच नव्हे, तर नवे तंत्र हिंदुस्थानात वापरता येऊ नये म्हणून कसून प्रयत्न करण्यात आले व अशा प्रकारे या देशाची आर्थिक वाढ रोखून नव्या धंद्यांना मनाई करण्यात आली.  हिंदुस्थानात देशी तयार मालाला बंदी करून अशी पोकळी बाजारात तयार केली की ती फक्त ब्रिटिश मालानेच भरली जावी.  त्यामुळे देशात बेकारी व दारिद्र्य झपाट्याने वाढत चालले.  वसाहतवजा जी अंकित राष्ट्रे असतील त्यांचे शोषण करण्याची एक अर्वाचीन नमुनेदार आर्थिक व्यवस्था आहे.  ती वापरून औद्योगिक इंग्लंडची हिंदुस्थान ही एक कृषिप्रधान वसाहत झाली.  हिंदुस्थानने कच्चा माल पुरवावा आणि इंग्लंडातील पक्का माल घ्यावा.

सारा कारागीरवर्ग, उद्योगधंद्यांतील लोक धंद्यांतून उठल्यामुळे बेकारी बेहद्द झाली.  आतापर्यंत शेकडो प्रकारच्या उद्योगधंद्यांत गुंतून असणार्‍या या कोट्यवधी लोकांनी आता काय करायचे ?  कोठे जायचे ?  जुना धंदा उरला नाही, नवीन पाहावा तर नवे धंदे बंद.  मरायला अर्थात बंदी नव्हती.  या भयंकर कोंडीतून सुटायला तो मार्ग नेहमीच मोकळा असतो, आणि ते मेलेच.  कोट्यवधी लोक मेले.  लॉर्ड बेंटिंक हा इंग्रज गव्हर्नर जनरल लिहितो, ''उद्योगधंद्याच्या इतिहासात येथील दुर्दशेला तुलना नाही.  हिंदभूमीला विणकरांची हाडे सर्वत्र पडून पांढरेपणा आला होता.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel